- अनिलकुमार मेहेत्रेपाचोड: परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना आणि न्यायालयीन कोठडीत तरुणाच्या मृत्यूच्या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा फाट्यावर रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. या घटनांच्या निषेधार्थ आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास पाचोड जवळ धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा फाट्यावर आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी दिलेल्या विविध घोषणामुळे राष्ट्रीय महामार्ग दणाणून गेला. यावेळी आंदोलकांनी परभणी येथील प्रकरणात आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, अटकेतील सर्व आंदोलकांची तत्काळ सुटका करावी, अमानुष अत्याचार करणाऱ्या परभणी पोलिसांवर कारवाई करावी, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे अशा मागण्या केल्या. या मागण्यांचे निवेदन पैठण तालुका महसूल विभागाचे मंडळ अधिकारी जयकुमार केकान, तलाठी अनुना कावळे, पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे पाटील यांना दिले. तब्बल वीस मिनिटे चाललेल्या आंदोलनाने राष्ट्रीय महामार्गावरील दोन्हीही बाजूकडील वाहतूक ठप्प पडली होती.
आंदोलनात अविनाश मिसाळ, राजू खरात, वैजनाथ घनघाव, उद्धव मगरे, विशाल मगरे, कृष्णा वाव्हळ, आकाश मगरे, सिद्धार्थ मगरे, देविदास मगरे आदी आंबेडकरवादी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चिमूकल्या आंदोलकांनी प्रबोधनात्मक भाषण करून लक्ष वेधून घेतले.