छत्रपती संभाजीनगर : शहरातील बौद्धलेणी डोंगररांगांमध्ये पश्चिमेला दहा किलोमीटर अंतरावरील हरण कडका डोंगर माथ्यावरील ३० एकराहून अधिक प्रशस्त व निसर्गरम्य परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऊर्जा भूमी आकार घेत आहे. डोंगरावर उभे राहणारे दीक्षाभूमीची प्रतिकृती आणि इगतपुरीतील विपश्यना सेंटरचे ध्येय असलेले हे स्मारक राज्यातील पहिलेच असून, जवळपास ९० फूट उंचीच्या स्तुपाचा परीघ ४७ मीटर एवढा भव्य आहे.
हे दहा मजली आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक चेतन कांबळे यांच्या संकल्पनेतून साकारत आहे. ५० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प डोंगरावर निसर्गरम्य परिसरातील ३० एकरात उभा राहत आहे. या स्मारकाच्या कामाने गती घेतली असून, प्रकल्पाचा पहिला टप्पा भीमजयंती २०२४ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा २५ फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा, विपश्यना सेंटर आणि भव्य स्तूप उभारणी पूर्ण होईल. डोंगरातील दोन किलोमीटर काँक्रिटीकरण करून रस्ता तयार केला आहे.
कसे असेल स्मारक?या स्मारकाचा परीघ ४७ मीटरचा, तर ३६ मीटरची डोम परिक्रमा आहे. उंची ९० फूट असेल. डॉ. आंबेडकर यांचा भव्य उभा पुतळा, अशोक स्तंभ, पंचशील ध्वज, स्तुपाला चार मुख्य प्रवेश द्वार आणि डोंगर रस्त्याने सांचीची प्रतिकृती असलेले दहा प्रवेशद्वार या ऊर्जाभूमीला असतील.
काय सुविधा असेल स्मारकात?इगतपुरीच्या धर्तीवर १०० व्यक्तींसाठी विपश्यना केंद्र, निवासी संकुल, आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन केंद्र, भिक्कू प्रशिक्षण केंद्र, आरोग्य केंद्र, निवासी शाळा आदी प्रकल्प येथे सुरू करण्यात येतील. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्ती येण्यासाठी हेलिपॅड केला जाईल.
ऊर्जाभूमी मध्यबिंदू या ऊर्जाभूमीच्या पूर्वेस बौद्धलेणी, भीमटेकडी आणि लोकुत्तरा महाविहार आणि पश्चिमेस मनपाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सफारी पार्क, जटवाडा येथे प्राचीन दिगंबर जैन मंदिर, वेरूळ लेणी, दौलताबादचा किल्ला यांचे ही ऊर्जाभूमी मध्यबिंदू आहे.
देशाच्या लौकिकात भर घालणारे स्मारकराज्य सरकारच्या २२ कोटी रुपये मदत निधीतून हा प्रकल्प उभा राहत असून, उर्वरित निधी लोकवर्गणीतून जमा केला जाईल. जगभरातील उपासक या ध्यान केंद्रासाठी येतील अशी व्यवस्था होणार आहे. दीक्षाभूमी व चैत्यभूमीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पावन स्पर्श लाभलेल्या या भूमीत उभी राहणारी ऊर्जाभूमी बौद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारात अग्रभागी राहील.- चेतन कांबळे, ऊर्जा भूमी केंद्राचे संकल्पक