सिल्लोड ( औरंगाबाद ) : सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध असतांना येथील काही डॉक्टर बाहेरील खाजगी डॉक्टरांशी कमिशन ठरवून रुग्णांना सिल्लोड व औरंगाबाद येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी रेफर करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा डॉक्टर व कर्मचाऱ्यांची चौकशीकरून थेट गुन्हा दाखल करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज दिले.
नागरिकांच्या वाढत्या तक्रारीवरून शुक्रवारी अचानक राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. रुग्णालयातील अस्वच्छता, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत अनियमितता, रुग्णालयातील सर्व विभाग, मेडिकल स्टॉक , स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली. यावेळी येथील अस्वच्छता , बंद अवस्थेत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे, आणि नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून त्यांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. सामान्यांना आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी सरकार विविध योजना राबवित आहेत. सरकारी रुग्णालये म्हणजे मंदिरापेक्षा कमी नाही मात्र काही मतलबी लोकांमुळे हे रुग्णालयात बदनाम होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, नगराध्यक्षा राजश्री निकम, तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे, न.प. तील शिवसेना गटनेते नंदकिशोर सहारे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सय्यद रफिक, उपमुख्याधिकारी रफिक पठाण, प्रशाकीय अधिकारी अजगर पठाण, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हाजी मोहंमद हनिफ, दीपाली भवर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित सरदेसाई, वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे, डॉ. गायकवाड, डॉ. इंगोले, मोईन पठाण, डॉ.दत्ता भवर हजर होते.