औरंगाबाद : रेल्वे स्टेशन एमआयडीसीतील भोगले ऑटाेमोटिव्ह कंपनी व्यवस्थापनाकडून होणाऱ्या त्रासानंतर कामगाराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नातेवाईकांनी कंपनी मालकासह अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करीत उद्योजक राम भोगले यांच्यासह इतरांनी आंबेडकरी समाजाला जातीय भावनेतुन टार्गेट केले. त्यातुन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा त्यांचा स्पष्ट हेतू आहे. त्यामुळे या उद्योजकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी आंबेडकरवादी अत्याचार कृती समितीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास स्वातंत्र्यदिनी भडकल गेट येथे उपोषणाचा इशारा देण्यात आला.
भोगले ऑटोमोटिव्ह कंपनीत कायमस्वरुपी नोकरीला असलेले सचिन गायकवाड यांना केवळ जातीयवादातुन कंपनीचे संचालक नित्यानंद भोगले आणि एचआर प्रमुख भूषण व्यवहाळकर हे मानसिक त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून त्यांनी ८ ऑगस्ट रोजी आत्महत्याचा प्रयत्न केला. ही घटना घडण्यापूर्वी सचिन यांनी कंपनी व्यवस्थापनाकडून त्रास होऊ नये, यासाठी पोलीस आयुक्त, कामगार आयुक्तांकडे न्याय मागितला होता. मात्र कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांचे वडिल उत्तम गायकवाड, आई अंजना गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे सिद्धोधन मोरे, सचिन शिंगाडे यांच्यासह काही जण कंपनी व्यवस्थापनास जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी भोगले, व्यवहाळकर, मिलिंद सोनगीरकर यांनी चर्चा करण्याऐवजी जातीवाचक शब्दप्रयोग केला. त्यावरुन वाद वाढला.
तेवढ्यात कंपनी व्यवस्थापनाने पोलिसांना बोलावून घेत अटक करण्यास लावून कार्यकर्त्यांवर चुकीचे गुन्हे दाखल केले. त्याचवेळी सिद्धोधन मोरे यांनीही कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात जातीवाचक शिविगाळ केल्याची तक्रार सातारा पोलीस ठाण्यात केली आहे. मात्र त्यावर काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही. घटनेची शहनिशा न करताच पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी एकतर्फी गुन्हे दाखल केल्याचा आरोपीही पत्रकार परिषदेत करण्यात आला. या पत्रकार परिषदेला कृती समितीचे श्रावण गायकवाड, ॲड. रमेशभाई खंडागळे, मुकुंद सोनवणे, के.व्ही. मोरे, मिलिंद दाभाडे, गौतम खरात, कृष्णा बनकर, नागराज गायकवाड, अंजन साळवे, संतोष भिंगारे, सचिन निकम, आनंद कस्तुरे, दीपक निकाळजे, प्रांतोष वाघमारे आदींनी संबोधित केले. यावेळी किरणराज पंडित, मुकुल निकाळजे, विजय वाहुळ, ॲड. अतुल कांबळे, जयश्री शिर्के आदींची उपस्थिती होती.
आंबेडकरवादी अत्याचार कृती समितीच्या मागण्या :-आंबेडकरी समाजाला टार्गेट करुन सामाजिक तेढ निर्माण करणारे उद्योजक राम भोगले, शिवप्रसाद जाजु, रमण अजगांवकर, सतीश लोणीकर, मानसिंग पवार, रवि माच्छर, संदेश झांबड यांच्या विरुध्द ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करावी.
- सचिन गायकवाड यांचा जबाब घेवून कंपनी संचालक नित्यानंद भोगले, भुषण व्यवहाळकर आणि मिलिंद सोनगीरकर यांचे विरुध्द गुन्हे नोंदवा.
- सिद्धोधन मोरे यांच्या तक्रारीवरुन कंपनी संचालक नित्यानंद भोगले भुषण व्यवहाळकर यांचे विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
-कर्तव्यात कसुर व एकतर्फी कार्यवाही करणारे सातारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांना निलंबीत करावे.