छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये (पोकरा) मधुमक्षिका पालन, फळबाग लागवड, तुती लागवड, ठिबक सिंचन व तुषार सिंचन आणि शेततळे, शेततळे अस्तरीकरणाचा लाभ देताना मोठा गैरव्यवहार झाल्याची वृत्त मालिका लोकमतने जुलै महिन्यात प्रकाशित केली होती. या वृत्तमालिकेनंतर कृषी विभागाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने चार महिन्यानंतर विभागीय कृषी सहसंचालकांना अहवाल सादर केला. या अहवालात समितीने कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘क्लीन चीट’ देत केवळ लाभार्थी शेतकऱ्यांना दोषी ठरवले आहे. या शेतकऱ्यांकडून त्यांना देण्यात आलेले अनुदान वसुलीची शिफारस केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
विविध योजनांचा शेकडो शेतकऱ्यांना २०२२ मध्ये लाभ देण्यात आला होता. शेतकऱ्यांना लाभ कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांचा अपहार करण्यात आला होता. याविषयी लोकमतने जुलै महिन्यात ‘पोकराला पोखरलं’ या टॅगलाईनखाली वृत्तमालिका प्रकाशित केली. यानंतर विभागीय कृषी सहसंचालकांनी वैजापूरचे उपविभागीय कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. समितीला पंधरा दिवसांत अहवाल देण्याची मुदत देण्यात आली होती. समितीने चार महिने चौकशी करून अहवाल नुकताच कृषी सहसंचालकांना सादर केला. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अहवालात रांजणगाव दांडगा, खादगाव आणि वडजी या तीन गावांतील २५ लाभार्थ्यांकडून ४० लाख ३३ हजार ८०० रुपये वसूल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
मधुमक्षिका पालन योजनेच्या चौकशीत समितीला काय आढळले ?- खादगाव येथील एक शेतकरी वगळता उर्वरित सर्वच लाभार्थी शेतकऱ्यांच्या मधुमक्षिका पेट्या बंद स्थितीत आढळून आल्या. मधकाढणी यंत्र केवळ ७ शेतकऱ्यांकडे दिसले.-शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या अनुदानानुसार प्रत्येक शेतकऱ्यांकडे ५० मधमाशी पेटी आणि ५० मधमाशी वसाहतींचे कप्पे याप्रमाणे पूर्ण साहित्य असायला हवे होते. मात्र शेतकऱ्यांकडे ५० पेक्षा कमी मधमाशी पेट्या आणि १० ते १५ मधमाश्यांच्या वसाहतींचे कप्पे दिसले.-मधुमक्षिका पालन संचासोबत असलेला चाकू, हाईव टूल, स्मोकर, ट्रे, हातमोजे, मधपेटी, स्टॅण्ड इ. साहित्य शेतकऱ्यांनी राजस्थान येथे भाड्याने दिल्याचे सांगितले. वडजी येथील शेतकऱ्यांनी हे साहित्य वापराअभावी खराब झाल्याचे सांगितले.-सर्वच लाभार्थ्यांनी मधमाश्या उष्णतेमुळे आणि खाद्य उपलब्ध नसल्याने मरण पावल्याचे सांगितले.-मधुमक्षिका पालन संगोपनासाठी सर्व लाभार्थ्यांनी प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र जोडले, परंतु एकाही शेतकऱ्याने फूलशेती अथवा फुले येणाऱ्या पिकांची लागवड न केल्याने मधमाश्या जिवंत राहू शकल्या नाहीत. परिणामी, अनुदानाचा अपव्यय झाला.