सर्वांधिक रुग्ण असलेल्या या गावात लाॅकडाऊनचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र आहे. येथील दुकाने बंद दिसत असले तरी शटर बंद ठेवून व्यवहार सुरूच असतात. मास्कशिवाय फिरणाऱ्यांची संख्या येथे भरपूर पाहावयास मिळते. शिऊर गावाचा परिसर मोठा आहे. नाशिक वैजापूरमार्गे औरंगाबाद व नांदगाव- औरंगाबाद हे दोन महामार्ग शिऊर हद्दीतून जातात. या मार्गावर नाकाबंदी नाही. येथून सर्रासपणे बाहेर जिल्ह्यात प्रवास सुरू असतो. या मार्गावरील हाॅटेलही सुरू असल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून दिसून आले. त्यामुळे गावात कोरोना संक्रमण वाढत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी झाल्यानंतर बाधित झालेल्या रुग्णांना कोरोना सेंटरमध्ये पाठविण्यात येते. मात्र, अनेक रुग्ण कोरोना सेंटरमध्ये न जाता घरीच राहून उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबीकडे येथील ग्रामपंचायत पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. विवाह समारंभ, अंत्यसंस्कारसारख्या कार्यक्रमांची अद्याप कुणीही परवानगी घेतली नसल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फरहाना खान यांनी स्पष्ट केले. एवढ्या मोठ्या गावात असे कार्यक्रम आतापर्यंत झालेच नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा अर्थ ग्रामपंचायतीने या कार्यक्रमाची दखल घेतली नसल्याचे स्पष्ट होते. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत व्हाॅट्सॲप ग्रुप करून कोरोनाबाधितांची नावे ग्रामपंचायतींना कळविण्यात येतात. त्यानंतर पुढील उपाययोजना करणे, ग्रामपंचायतीचे कर्तव्य आहे. मात्र, याचे पालन केले जात नाही. चार दिवसांपूर्वी शिऊर येथे सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये आतापर्यंत केवळ तीनच जण दाखल झाल्याचे दिसून येत आहे.
चौकट
ग्रामरक्षक दल नुसतेच कागदोपत्री
शिऊर पोलीस ठाण्यात ग्रामरक्षक दल कार्यान्वित दिसत असले, तरी ते केवळ कागदोपत्री असून कोरोना कार्यात त्यांचा कुठलाही सहभाग दिसून येत नाही. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असले तरी बाधित झालेले रुग्ण घरीच उपचार घेणे पसंत करत आहेत. तेही कोरोना फैलाव होण्यास कारण ठरले आहेत.
पॉइंटर...
शिऊरची लोकसंख्या- ११ हजार ५६०
गावात कोरोना रुग्णसंख्या- ३४१
कोरोनाने मृत्यू झालेले रुग्ण - २२