छत्रपती संभाजीनगर : शहरातील १८ लाख नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचे दायित्व महापालिकेवर आहे. कोरोना संसर्गानंतर महापालिकेची आरोग्य यंत्रणा बरीच सक्षम झाली. बाह्य रुग्ण विभागात रुग्णांना सर्व औषधीही मिळू लागली. मात्र, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा वेळ दिवसभर केंद्र, राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती भरून देण्यात जातो. त्यामुळे संपूर्ण यंत्रणाच मेटाकुटीला आली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ४१ आरोग्य केंद्रे चालविण्यात येतात. यामध्ये पाच रुग्णालयांचाही समावेश आहे. एन-११, एन-८, कैसर कॉलनी, बन्सीलालनगर, सिल्कमिल कॉलनी ही रुग्णालये नावालाच आहेत. ११ ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात आला. ही सर्व ठिकाणे मिळून ४० डॉक्टर, ३५० पेक्षा अधिक कर्मचारी नियुक्त आहेत. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आरोग्य केंद्रांमध्ये बाह्य रुग्णसेवा दिली जाते. आपला दवाखाना दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत चालविण्यात येतो. मनपाच्या काही आरोग्य केंद्रांचा भार राष्ट्रीय आरोग्य अभियान चालविते. डॉक्टर, कर्मचारी आणि औषधीही मनपाला दिली जाते. पूर्वी आरोग्य केंद्रांवर रक्त तपासण्या होत नव्हत्या. आता आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी महालॅबमार्फत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या मोफत करून घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आरोग्य केंद्रांवर गरोदर माता, ० ते ५ वयोगटातील बालकांचे लसीकरण याशिवाय केंद्र, राज्य शासनाच्या सर्वच योजनांची अंमलबजावणी करावी लागते. दररोज केलेल्या कामांचे रिपोर्टिंग त्याच दिवशी करणे आवश्यक असल्याने डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर ताण प्रचंड वाढतोय. रुग्णसेवा कमी आणि रिपोर्टिंग जास्त, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे २०० बेड आहेत, तेथे दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी मनपाने प्रयत्न केले, एमबीबीएस डॉक्टरांसाठी अनेकदा जाहिरात दिली तरी कोणी येण्यास इच्छुक नाही.
रुग्णसेवेत आमूलाग्र बदलचार वर्षांपूर्वीपर्यंत महापालिकेची आरोग्यव्यवस्था कमकुवत होती. आता कोट्यवधी रुपये खर्च करून आरोग्य केंद्रे अद्ययावत केली जात आहेत. दिल्लीच्या धर्तीवर आरोग्य केंद्रे सक्षम होतील. सर्व आरोग्य केंद्रांवर रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय, आपला दवाखानाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळतोय. कल्याणकारी याेजनांच्या रिपोर्टिंगचा ताण यंत्रणेवर निश्चितच वाढला आहे.-डॉ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी