छत्रपती संभाजीनगर : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये छत्रपती संभाजीनगर शहराचा समावेश आहे. त्यानुसार मिळालेल्या कोट्यावधीच्या निधीतुन विविध विकासकामे केली आहेत. या कामांचा कार्य अहवाल संशोधनाच्या माध्यमातून तयार करून शासनाला सुपूर्द केला जाणार असल्याची माहिती देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याशिवाय शासकीय योजनांची अंमलबजावणी, तरुणांसाठी असलेल्या कौशल्य विकास प्रकल्पाचेही सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
देवगिरी महाविद्यालयात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे ज्येष्ठ सदस्य पंडितराव हर्षे, प्राचार्य डॉ.अशोक तेजनकर, उपप्राचार्य डॉ. दिलीप खैरनार, डॉ. अनिल आर्दड, डॉ. अपर्णा तावरे यांच्यासह इतर उपस्थित होते. यावेळी डॉ. खैरनार म्हणाले, समाजशास्त्र विभागातर्फे शासकीय योजनाच्या अंमलबजावणीचे वास्तव, तरुणांसाठीच्या कौशल्य विकास प्रकल्प योजनेचा फायदा, स्मार्ट सिटीमुळे शहरात झालेला बदल संशोधनाच्या माध्यमातुन समोर आणण्यात येत आहे. स्मार्ट सिटीसाठी नुकतीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. तावरे म्हणाल्या, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने वेगवेगळ्या ठिकाणी १ हजार ५०० वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्यात पोलिस बटालियनसह चितेगाव, आडगाव बुद्रुक, गाडेवाड तांडा, गांधेली, वडखा आणि सारोळा गावात वृक्षांची लागवड केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सूत्रसंचलन व आभार डॉ. अनिल आर्दड यांनी मानले.
रेनवॉटर हॉरवेस्टींगचे भरवणार प्रदर्शनमहाविद्यालयातील भूशास्त्र विभागातर्फे शहरात रेनवॉटर हॉरवेस्टींगबद्दल जनजागृती केली जाणार आहे. त्याशिवाय महाविद्यालयात १४ ऑगस्ट रोजी रेनवॉटर हॉरवेस्टिंगचे प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याचे प्राचार्य डॉ. तेजनकर यांनी सांगितले. शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २५ ते ३० टक्के पाणी कुपनलिका, विहिरीच्या माध्यमातुन होती.त्यामुळे हा साठा कायम राहण्यासाठी रेनवॉटर हॉरवेस्टिंग महत्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.