औरंगाबाद : बीड बायपास, पैठण रोड, नक्षत्रवाडी आणि विटखेड्यासह लहान-मोठ्या १३ गावांतील नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या सातारा ठाण्याची भौगोलिक हद्द विचित्र आहे. परिणामी बजाज कंपनीच्या गेटजवळ अपघात झाल्यास मदतीसाठी नागरिकांना जवळचे ठाणे सोडून सात ते आठ किलोमीटर अंतरावरील सातारा ठाण्यात यावे लागते.
बायपास, सातारा परिसर, पैठण रोडच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या संख्येने नवनवीन नागरी वसाहती तयार होत आहेत. कोणत्याही नागरी सुविधा उपलब्ध नसताना नागरिक तेथे राहण्यासाठी आले आहेत. वाढत्या नागरी वसाहतींच्या सुरक्षेचा विचार करून २०१२ साली सातारा पोलीस ठाण्याची स्थापना झाली. तेव्हापासून सातारा ठाणे बायपासजवळील एका भूखंडावर पत्र्याच्या शेडमध्ये कार्यरत आहे. या ठाण्यांतर्गत विटखेडा, कांचननगर, नक्षत्रवाडी, कदम वस्ती, सातारा गाव, सातारा तांडा क्रमांक १ आणि तांडा क्रमांक २, गोलवाडी, पाटोदा, वळदगाव, गंगापूर नेहरी, देवळाईच्या काही भागांसह १३ गावे आहेत. शिवाय ७० ते ८० नागरी वसाहती आहेत. रेल्वेस्टेशन परिसर, सादातनगर, हमालवाडा, बायपास, सातारा परिसर, पैठण रस्त्यावरील विविध वसाहतींचा यात समावेश आहे. बीड बायपास, पैठण रस्ता हे प्रमुख मार्ग या ठाण्यात येतात. सातारा ठाण्यात दरवर्षी सरासरी पाचशे ते साडेपाचशे गुन्ह्यांची नोंद होते. यात सर्वाधिक गुन्हे हे रस्ता अपघात, मारहाणीच्या घटना, घरफोड्या आणि जमीन,भूखंड खरेदी व्यवहारात फसवणुकीचे असतात.
या ठाण्याची हद्द निश्चित करताना सामान्य नागरिकांच्या सोयीचा विचार क रण्यात आला नाही. त्यावेळी झालेल्या चुकांचा फटका आता सामान्यांना बसतो आहे. पावसाळ्यात या ठाण्याच्या छतावरील पत्रे गळतात, पावसाचे पाणी ठाण्यात शिरते. ही बाब लक्षात घेऊन पोलीस अधिकाऱ्यांनी ठाण्यासाठी दुसरी इमारत भाड्याने घेण्याचे निश्चित झाले. इमारतही पसंत करण्यात आली. मात्र त्यावर प्रशासनाकडून निर्णय झालानाही.
सिडकोने दिली गोलवाडीत जागास्वत:च्या जागेत पोलीस ठाणे उभारावे अशा सूचना मिळाल्याने सिडकोेकडे पोलीस ठाण्यासाठी जागेची मागणी करण्यात आली. तेव्हा सिडकोने गोलवाडी येथे पोलीस ठाण्याकरिता जमीन उपलब्ध करून दिली. त्या जागेवर पोलिसांना इमारत बांधावी लागणार आहे. मात्र गोलवाडी येथे ठाणे स्थलांतरित करण्यास बायपास आणि सातारा परिसरातील नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. महानुभाव आश्रम चौकी परिसरात ठाणे उभारल्यास ते सोयीचे ठरेल, अशी एक भूमिका समोर आली आहे.
ठाण्याचे विभाजन आवश्यकसातारा ठाण्याची हद्दच खूप मोठी आहे. बायपास, पैठण रोड आणि लिंक रोडवर सतत अपघात घडत असतात. शिवाय वाळूज रस्त्यावरील बजाज कंपनीच्या गेटपर्यंत सातारा ठाण्याची हद्द येते. तेथे एखादी घटना घडल्यास तेथे पोहोचण्यासाठी पोलिसांचा बराच वेळ जातो. शिवाय गोलवाडी परिसर, पाटोदा गाव, पैठण रस्त्यावरील जकात नाक्यापर्यंत ठाण्याची हद्द येते. इकडे देवळाई चौकापासून अर्धा किलोमीटरपर्यंतचे अंतर सातारा ठाण्यात येते. परिसरातील वाढत्या नागरी वसाहतीमुळे गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाण्याच्या हद्दीची पुनर्रचना व्हावी अथवा ठाण्याचे विभाजन होऊन नवीन ठाणे उभारण्याची गरज आहे. - प्रेमसागर चंद्रमोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सातारा ठाणे
सातारा ठाणे : सातारा ठाण्याचे प्रमुख - प्रेमसागर चंद्रमोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक़.अन्य पदे- एक सहायक निरीक्षक, चार उपनिरीक्षक, ७० पोलीस कर्मचारी.दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची सरासरी संख्या - ५०० ते ५५०एकूण नागरी वसाहती सुमारे - ७0खेडी- १३