राम शिनगारे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेश रगडे यांनी शुक्रवारी सायंकाळी राजीनामा दिला. कुलगुरूंनी नवीन संचालकांची शोधाशोध सुरू केली असून, पदभार कोण घेणार याविषयी उत्सुकता आहे.विद्यापीठात मागील साडेतीन वर्षांपासून पूर्णवेळ परीक्षा नियंत्रकपद रिक्त आहे. तत्कालीन परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्याकडे प्रभारी पदभार सोपवला होता. विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. बी. ए. चोपडे यांच्या निवडीनंतर कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांच्याकडे परीक्षा नियंत्रकपदाची धुरा सोपविण्यात आली. त्यांनी अल्पावधीतच अनेक बदल केले; मात्र त्यांच्यावर काही संघटनांनी आक्षेप घेताच त्यांच्या जागी डॉ. वाल्मीक सरवदे यांना नेमण्यात आले. डॉ. सरवदे यांनी काही दिवस कारभार सांभाळल्यानंतर राज्यपालांच्या भेटीवरून त्यांचा कुलगुरूंसोबत विसंवाद झाला. यातच त्यांनी राजीनामा दिला. यानंतर कुलगुरूंनी डॉ. प्रल्हाद लुलेकर यांची नेमणूक केली; मात्र डॉ. लुलेकर सेवानिवृत्त झाल्यामुळे परीक्षा विभागाचा दीर्घकालीन अनुभव असलेले उपकुलसचिव डॉ. दिगंबर नेटके यांना प्रभारी पदभार देण्यात आला. याच काळात विद्यापीठ कायदा बदलून नवीन कायदा लागू करण्यात आला. या कायद्यानुसार परीक्षा नियंत्रकाऐवजी परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक असे नामकरण झाले; मात्र साई इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाने परीक्षेत केलेल्या गोंधळामुळे कुलगुरूंनी डॉ. नेटके यांचा पदभार २० मे रोजी काढला. त्यांच्या जागी पर्यटन विभागाचे प्रमुख डॉ. राजेश रगडे यांची नियुक्ती केली; मात्र त्यांनी पदभार घेतानाच सर्व अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर होईपर्यंत पदावर राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे त्यांनी सर्व निकाल लागताच शुक्रवारी (दि. १) पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा कुलगुरूंनी मंजूर करून नवीन संचालकांची शोधाशोध सुरू केली आहे.कॅरिआॅनमुळे त्रस्तडॉ.राजेश रगडे यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वर्धापनदिनी त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले; मात्र त्यानंतर आठ दिवसांतच त्यांनी राजीनामा दिला. यामागे कुलगुरूंनी अभियांत्रिकीसाठी कॅरिआॅन आणि एटीकेटीची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कायद्यात बदल करावा लागतो. तो बदल न करताच अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यात विनाकारण अडकण्यापेक्षा पदावरून दूर होणे योग्य असल्यामुळे डॉ. रगडे यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संचालकांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 12:16 AM