छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वीच विद्यमान प्रभारी कुलसचिव, परीक्षा संचालक, विद्यार्थी कल्याण विकास मंडळाच्या संचालकांसह इतरांनी राजीनामा दिला आहे. त्याशिवाय कुलगुरूंसाेबतच प्रकुलगुरू आणि चार अधिष्ठातांचाही कार्यकाळ पूर्ण होणार आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी प्रशासनातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहत विनाकारण त्रास देणाऱ्या विविध संघटनांसह पदाधिकाऱ्यांपासून संरक्षण देण्याचे काम केले. अधिकाऱ्याने चुकीचे काम केले असेल तर संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला. मात्र, काहींचे हित न जपल्यामुळे टार्गेट केल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी कुलगुरू ठामपणे उभे राहिले. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांसह संचालकांना उत्तमपणे काम करता आले.
मात्र, ३१ डिसेंबर रोजी कुलगुरूंचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यापूर्वीच कुलसचिव डॉ. भगवान साखळे, परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी, ताराबाई शिंदे अध्यासन केंद्राच्या संचालक डॉ. वीणा हुंबे, अकॅडमिक स्टाफ कॉलेजच्या संचालिका डॉ. धनश्री महाजन यांनी राजीनामे दिले आहेत. विद्यार्थी विकास कल्याण मंडळाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान यांचा २९ डिसेंबर रोजी कार्यकाळ पूर्ण होत असल्यामुळे त्यांनी मुदतवाढीस नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कुलगुरू डॉ. येवले यापैकी कोणाचा राजीनामा स्वीकारतात आणि कोणाला नियुक्ती देतात, याकडे विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याविषयी कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी 'नो कॉमेंट्स' असे उत्तर दिले.
विभागप्रमुखांना नको कार्यभारदरम्यान, विद्यापीठातील दोन विभागांच्या प्रमुखांनी कुलगुरूंकडे राजीनामा सुपूर्द केला होता. कुलगुरूंनी एकाचा राजीनामा फेटाळला आहे तसेच दुसऱ्या विभागप्रमुखाची समजूत काढली. या दोन्ही विभागप्रमुखांना सहकाऱ्याचा त्रास आहे. ३१ डिसेंबरनंतर कुलगुरू डॉ. येवले पदमुक्त झाल्यानंतर आपली बाजू कोण ऐकून घेईल, या भावनेतून संबंधितांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.
काय आहेत कारणे?राजीनामा देण्यामागे कुलगुरूंचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याचे प्रमुख कारण आहे. काम करताना काही चुका झाल्याच तर सांभाळून घेणारे कुलगुरू असतील का? तसे कुलगुरू नसतील, विद्यापीठाचे पदाधिकारी, विविध संघटनांच्या रोषापेक्षा पदावरून दूर जाणे अनेकांनी पसंत केले आहे.