छत्रपती संभाजीनगर : ‘समान नागरी कायदा’ फक्त मुस्लिम समाजाची धार्मिक ओळख मिटविण्यासाठी सुरू असलेली कवायत असल्याचा आरोप मंगळवारी येथे एमआयएमचे अध्यक्ष खा. असोदुद्दीन ओवेसी यांनी केला. या कायद्यामुळे फक्त मुस्लिम समाजाला झळ बसेल, असे नाही. अन्य धर्मीयांनाही याचे परिणाम भाेगावे लागतील, अनुसूचित जाती, आदिवासी अशा अनेकांना त्रास होणार आहे, त्यासाठी विरोधाचे अस्त्र उपसले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
तापडिया नाट्यमंदिर येथे मंगळवारी सायंकाळी समान नागरी कायद्यासंदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले की, समान नागरी कायदा हा संघ परिवाराचा अजेंडा आहे. या देशात वेगवेगळ्या धर्म, जातीचे नागरिक राहतात. त्यांच्या व्यक्तिगत हक्काला हात लावू नये. नवीन कायद्यात धर्म, जातीची ओळख पुसण्याचे काम केले जाणार आहे. लॉ कमिशनने यासंदर्भात नागरिकांकडून मत मागविले आहे, सरकारचा हट्टवाद आहे, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेले हे काम आहे. पंतप्रधान म्हणतात, एका घरात दोन कायदे चालणार नाहीत, त्यांना माहीत नाही, या देशात शेकडोंच्या संख्येने व्यक्तिगत कायदे आहेत. अमित शहा यांना सांगावे लागले, या कायद्यापासून आदिवासी, ख्रिश्चन समाजाला दूर ठेवण्यात येईल.
प्रास्ताविक खा. इम्तियाज जलील यांनी केले. केंद्राचे मनसुबे कसे आहेत, हे त्यांनी नमूद केले. यावेळी हाफेज अब्दुल अजीम, बंजारा समाजातर्फे चुन्नीलाल जाधव, धनगर समाजाचे प्रतिनिधी संजय फटांगळे, शीख समाजाचे खडकसिंह ग्रंथी, साहित्यिक ऋषिकेश कांबळे, मालेगावचे मुफ्ती इस्माईल, ॲड. खिजर पटेल, चर्मकार समाजातर्फे गोपाल बछिरे, बिशप मधुकर कसाब, भन्ते बुद्धपाल, माैलाना कवी फलाही यांनीही समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर आपले विचार मांडले. संचालन सोहेल जकियोद्दीन यांनी केले. आभार शारेक नक्षबंदी यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.