औरंगाबाद : दुसऱ्या धर्माची हेटाळणी करणे किंवा त्या धर्मातील श्रद्धांना ठेच पोहोचवणे म्हणजे धर्मनिरपेक्ष आहोत, असा अर्थ काढणे चुकीचे असून सर्वांचा आदर करणे हीच खरी सहिष्णुता आहे, असे मत राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार यांनी व्यक्त केले. लोकसंवाद फाऊंडेशनतर्फे प्रत्येक रविवारी आयोजित केल्या जाणाऱ्या ऑनलाइन संवादमालेत राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार यांनी ‘भारतीय राजकारणाची बदलती विषयपत्रिका : सहिष्णुता’ या विषयावर भूमिका मांडली.
डॉ. पवार म्हणाले, देशात मागील काही दिवसांपूर्वी दोन लाटा आल्या. यात कोरोनाची एक लाट आणि दुसरी लाट ही शेतकऱ्यांच्या आंदोलनाची होती. ज्या पद्धतीने कोरोनाची लाट थोपविण्यासाठी केंद्र शासनाने प्रयत्न केले, त्यात सहिष्णुतेचा पूर्णपणे अभाव असल्याचे दिसून आले. त्याचवेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनात पूर्णपणे सहिष्णुता असल्याचे दिसून आले. कोणत्याही जाती, धर्म, पंथाचा तिरस्कार नव्हता. प्रत्येकाचा आदर या आंदोलनाच्या वेळी केल्याचेही देशाने पाहिले.
सन २०१९ मध्ये केंद्रातील सरकारला पहिल्यापेक्षा अधिक बहुमत मिळाले होते. त्याचवेळी राज्याराज्यांमध्ये झालेले सत्ताबदल, मतदान यातून सहिष्णुतेला अधिक प्राधान्य मिळाल्याचे समोर आले. त्याच वर्षी झालेल्या निवडणुकीत ओडिशा, हरियाणा, महाराष्ट्रात भाजपला सत्ता दिलेली नव्हती. महाराष्ट्रात युतीला बहुमत मिळालेले असताना सत्तेचे समीकरण बदलले. यावर्षी बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू राज्यात भाजपाला जोरदार हादरा बसला. राज्याराज्यांमधील सत्तेसाठी जनतेने सहिष्णुतेला प्राधान्य दिल्याची उदारहणे आपल्यासमोर आहेत. त्यामुळे देशपातळीवर सहिष्णुतेची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्याशिवाय पर्याय निर्माण होणार नाही, असे पवार म्हणाले.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे, सचिव डॉ. गणेश मोहिते, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. राम चव्हाण, प्रा. बंडू सोमवंशी, डॉ. कैलाश अंभोरे आदी उपस्थित होते.