वाळूज महानगर : निर्यात क्षेत्रातील संधी व विकास या संदर्भात उद्योजकांसाठी वाळूजला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत तज्ज्ञानी मार्गदर्शन करुन उद्योजकांच्या शंकाचे निरसन केले.
औरंगाबादमधील लघु-सुक्षम व मध्यम उद्योजकांना विकास संदर्भात संधी व कायदेशिर बाबी माहिती व्हाव्यात या उद्देशाने मसिआ, जीआयईएनटी व स्काऊट ग्रुप पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वाळूज येथील मसिआ सभागृहात ही कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून मसिआचे अध्यक्ष किशोर राठी, उपाध्यक्ष ज्ञानदेव राजळे, स्काऊट ग्रुपचे कार्यकारी संचालक मंगेश वानखेडे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश वानखेडे, राघवेंद्र कुलकर्णी, रविंद्र भुयारकर उपस्थित होते.
मंगेश वानखेडे म्हणाले की,जीआयईएनटीच्या माध्यमातून उद्योजकांना महाराष्टÑासह संपूर्ण भारत देश व परदेशातील उद्योगांशी व्यवसायिकदृष्टया संपर्क करणे शक्य होणार असून, यासाठी उद्योजकांनी संकेतस्थळावर नोंदणी करणे गरजेचे आहे. कार्यशाळेत आॅनलाईन पद्धतीने स्काईपद्वारे व्हिडीओ कॉलद्वारे चीनमधील अनिव्हो गोरायो यांनी उद्योजकांशी संवाद साधला. रविंद्र भुयारकर यांनी उद्योजकांनी व्यावसाय वाढीसाठी मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. तर कार्यशाळेमुळे लघु उद्योजक निर्यात क्षेत्रात पाऊले टाकतील असे सांगून किशोर राठी म्हणाले की, या भविष्यात आणखी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल. कार्यशाळेला वाळूज उद्योनगरीतील ४० उद्योजकांची उपस्थिती होती. कार्यशाळेला संदीप नागोरी, मसिआचे सचिव गजानन देशमुख, सहसचिव राहुल मोगले, सुमीत मालानी, प्रसिध्दी प्रमूख अब्दुल शेख, मनीष अग्रवाल, अर्जुन गायकवाड, संदीप जोशी आदीसह उद्योजकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.