लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दिवाळीच्या सणाचा आनंद द्विगुणित होतो तो खमंग, गोडधोड पदार्थांनी. दिवाळी सरली तरी फराळाची चव नंतरही कित्येक दिवस जिभेवर रेंगाळत असते. खास दिवाळीसाठी घराघरातील महिला फराळाचे अनेक पदार्थ आवर्जून घरी बनवितात. मात्र वेळेअभावी आजच्या महिलांना फराळाचे सर्वच पदार्थ घरी बनविणे शक्य होत नाही. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत नोकरदार महिलांचा कल विकतच्या मात्र ‘घरगुती’ पद्धतीने बनविलेल्या फराळाच्या खरेदीवर अधिक असल्याचे दिसून आले.जुन्या काळच्या दिवाळीच्या आठवणी सांगताना घरातील ज्येष्ठ मंडळी आवर्जून सांगतात की, त्या काळी दिवाळीत सर्व गल्लीतील बायका एकत्र जमायच्या आणि एकाच ठिकाणी सगळ्या मिळून अख्ख्या गल्लीचा फराळ तयार करायच्या.मनुष्यबळ आणि वेळ असल्यामुळे त्याकाळी हे सहज जमायचे. अजूनही काही खेडेगावांमध्ये ही पद्धत टिकून आहे. शहरात मात्र ही पद्धत जवळपास हद्दपार झाल्यासारखीच आहे. त्यात महिलाही कमावत्या झाल्यामुळे वेळेअभावी फराळाचे सर्वच पदार्थ घरी तयार करणेही शक्य होत नाही. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत एखादा पदार्थ घरी तयार करून इतर पदार्थ ‘रेडिमेड’ आणण्याकडे महिलांचा कल दिसून आला.त्यातही दुकानातील फराळाचे पदार्थ विकत न घेता घरगुती फराळ बनविणाºया महिलांकडेच ग्राहकांचा जास्त ओढा दिसून आला. विकतचा पदार्थ असला तरी त्याला ‘घरगुती’ आपलेपणाचा स्पर्श झाल्यासारखे वाटत असल्यामुळे आपण दरवर्षी अशा फराळाला अधिक पसंती देत असल्याचे अनेक नोकरदार महिलांनी सांगितले.