औरंगाबाद : कोणी एकटेच आले होते.... कोणी कुटुंबासह... तर कोणी गटागटाने... पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर रक्तदान केल्याचा आनंद आणि गरजू रुग्णाला जीवदान दिल्याचे समाधान झळकत होते. निमित्त होते ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदानाच्या महायज्ञाचे. लोकमत भवन येथे आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिराला शुक्रवारी (दि.२) रक्तदात्यांनी उदंड प्रतिसाद दिला. शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना, शासकीय-अधिकारी कर्मचाऱ्यांनी भरभरून सहभाग नोंदविला.
लोकमत भवन येथे सकाळी १०.३० वाजता महारक्तदान शिबिराला प्रारंभ झाला. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होईल, यादृष्टीने शिबिराच्या ठिकाणी नियोजन आणि खबरदारी घेण्यात आली होती. अगदी सकाळपासूनच दात्यांमध्ये रक्तदानासाठी उत्साह पाहण्यास मिळाला. रक्तदात्यांची पावले लोकमत भवनकडे वळली होती. रक्तपेढीकडे नोंदणी करून रक्तदाते रक्तदान करत हाेते. कोरोना प्रादुर्भावात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा दूर होण्यास योगदान देण्यासाठी शिबिरातील प्रत्येक जण पोहोचला होता. आपल्या एका रक्तदानामुळे कोणाला तरी नवीन आयुष्य मिळेल, जीवदान मिळेल, अशीच प्रत्येकाची भावना होती. अनेकांनी कुटुंबासह रक्तदानात सहभाग नोंदविला. अगदी शिबिराचा समारोप होईपर्यंत रक्तदात्यांचा ओघ कायम होता.
तरुणाई आघाडीवर
रक्तदानात तरुणाईचा मोठा सहभाग पहायला मिळाला. एकप्रकारे तरुणाई रक्तदान करण्यात आघाडीवर होती. रक्तदान करण्यात महिला आणि युवतीही पुढे होत्या.
४० ते ६० वयोगटातही उत्साह
कोरोना प्रादुर्भावाचा कोणताही गैरसमज, भीती न बाळगता ४० ते ६० वयोगटातील रक्तदातेही मोठ्या उत्साहाने रक्तदानासाठी पुढे आले होते. गरजू रुग्णांना जीवदान देण्यासाठी नेहमीच रक्तदान करीत असल्याच्या भावना या वर्गातील रक्तदात्यांनी व्यक्त केल्या.
कोणाची पहिलीच, तर कोणाची ११५ वी वेळ
शिबिरात रक्तदान करण्याची पहिलीच वेळ होती, तर कोणाची ११५ वी वेळ होती. नव्या रक्तदात्यांपासून तर नियमितपणे रक्तदान करणाऱ्या नागरिकांनीही शिबिरात सहभाग नोंदविला.
दुर्मीळ रक्तगटाचे दातेही सहभागी
दुर्मीळ रक्तगटाचे रक्त मिळविण्यासाठी गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना भटकंती करावी लागते. हीच परिस्थिती ओळखून शिबिरात दुर्मीळ रक्तगटाचे दातेही सहभागी झाले होते.
प्रमाणपत्रासह छायाचित्र, सेल्फी
रक्तदान केल्यानंतर दात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रमाणपत्रासह आणि ‘लोकमत रक्ताचं नातं’ असे घोषवाक्य असलेल्या सेल्फी पाॅइंटवर रक्तदाते छायाचित्र, सेल्फी घेत होते. अनेकांनी आपले छायाचित्र सामाजिक माध्यमांवर शेअर करीत रक्तदानाचे आवाहन केले.
जि.प. च्या सीईओंनी केले रक्तदान
महारक्तदान शिबिराच्या शुभारंभानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनीही रक्तदान केले. त्यांची रक्तदानाची ही २६ वी वेळ होती.
विभागीय रक्तपेढी आणि लायन्स ब्लड बँकेतर्फे रक्तसंकलन
शिबिरात घाटीतील विभागीय रक्तपेढी आणि लायन्स ब्लड बँकेतर्फे रक्तसंकलन करण्यात आले. विभागीय रक्तपेढीतर्फे विकृतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. अनिल जोशी, रक्तपेढी प्रमुख डाॅ. सुरेश गवई, रक्तसंक्रमण अधिकारी डाॅ. सिम्मी मिंज, डाॅ. प्राची मोडवान, डाॅ. दीपमाला करंडे, डाॅ. पूजा लगसकर, डाॅ. तेजस्विनी जाधव, जनसंपर्क अधिकारी हनुमान रुळे, तंत्रज्ञ पूजा जांगीड, देवकुमार तायडे, मजहर शेख, बबन वाघ, अविनाश देहाडे, मनोज पंडित, हमास शेख, प्रतीक्षा गायकवाड, स्नेहा अक्कलवार यांनी रक्तसंकलनासाठी परिश्रम घेतले. तर लायन्स ब्लड बँकेतर्फे डाॅ. प्रकाश पाटणी, डाॅ. एजाज पठाण, जनसंपर्क अधिकारी मनोज चव्हाण, अनिलकुमार शर्मा, निलेश इंगल, सूर्यकांत तांबे, अश्विनी नरवडे, झाकेर माेहंमद, संदीप वाघमारे, नागेश हिवराळे, अविनाश सोनवणे, भारती अंध्याल यांनी रक्तसंकलन केले.
...यांनी नोंदविला सहभाग
औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ, ऑटोमोबाईल्स टायर्स ॲण्ड डिलर्स असोसिएशन, सीए संघटना, औरंगाबाद जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर्स ग्रुप, महावितरण अधिकारी-कर्मचारी, तसेच महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, शिक्षक संघटना, पोलीस अधिकारी-कर्मचारी, टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, नमोकार एसएमएस सेवा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) आदींनी सहभाग नोंदवून रक्तदान केले.