औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विद्यार्थी, विविध कामांसाठी येणारे अभ्यागत व कर्मचारी-प्राध्यापकांसाठी तब्बल १.५ कोटी रुपये खर्चून पर्यावरण पूरक ‘सेंट्रल लंच होम’ उभारले. मात्र, गेल्या सात महिन्यांपूर्वी या लंच होमवरील कोसळलेल्या ‘डोम’ची जबाबदारी प्रशासनाने अद्याप कोणावरही निश्चित केलेली नाही.
अलीकडे पर्यावरणपूरक लंच होमची संकल्पना बरीच रूढ झाली आहे. त्यानुसार ‘नॅक’ मूल्यांकनासाठीआलेल्या समितीने विद्यापीठात पायाभूत सुविधांमध्ये ‘सेंट्रल लंच होम’ नसल्याची त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार, चार वर्षांपूर्वी विद्यापीठाने प्रशासकीय इमारतीसमोरील मोकळ्या जागेत ‘सेंट्रल लंच होम’ उभारले. ऑगस्ट, २०१६ मध्ये या लंच होमचे उद्घाटन झाले. या लंच होमवर दोन्ही बाजूला प्रत्येकी १५ लाख असे एकूण ३० ते ३५ लाख रुपये खर्चून दोन डोम उभारले होते. त्यापैकी डाव्या बाजूचा एक डोम जुलैमध्ये पावसाळ्यात कोसळला. तेव्हा लॉकडाऊनमुळे हे लंच होम बंद असल्याने सुदैवाने कोणाला हानी पोहोचली नाही.
त्यानंतर कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी बांधकाम तज्ज्ञांकडून लंच होमची तपासणी करुन घेतली. तेव्हा लंच होमचा विमा उतरविला असल्याने पडलेल्या डोमसंबंधी विमा कंपनीकडे ‘क्लेम’ करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, बांधकाम विभागाने विमा कंपनीकडे ‘क्लेम’ सादर केला, पण त्याची रक्कम अजूनही विद्यापीठाला मिळाली नाही. दुसरीकडे ‘डोम’ उभारणाऱ्या कंत्राटदाराची सुरक्षा ठेव रक्कम व बिलाचा शेवटचा हप्ता असे एकूण ८ लाख ५० हजार रुपये देणे रोखून धरण्याचे निर्देशही कुलगुरूंनी विद्यापीठ बांधकाम विभागाला दिले आहेत. १५ लाखांहून अधिक रकमेचा ‘डोम’ अवघ्या चार वर्षांत पडतो. निकृष्ट बांधकाम झाले असेल का किंवा ‘डोम’साठी निकृष्ट साहित्याचा वापर केला का, याचा शोध घ्यावा, असे विद्यापीठ प्रशासनाला वाटले नाही, ही आश्चर्यकारक बाब आहे.
चौकट.....
नवीन ‘डोम’साठी निविदा प्रक्रिया सुरू करणार
या संदर्भात कुलगुरू डॉ.प्रमोद येवले म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमध्ये काहीही होऊ शकते. एकाच कंत्राटदाराने दोन्ही ‘डोम’ उभारले आहेत. एक ‘डोम’ सुस्थितीत आहे आणि बाजूचा दुसरा ‘डोम’ पडला आहे. त्यामुळे निकृष्ट साहित्य वापरले, असे म्हणता येणार नाही. विमा कंपनीकडे ‘क्लेम’ केला आहे. त्याला वेळ लागेल. दरम्यान, नवीन ‘डोम’ उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे.