औरंगाबाद : कोरोनाचे उपचार घेऊन घरी गेल्यानंतर पुढील ३ महिने खबरदारी घेणे गरजेचे आहे. कारण, घरी गेल्यानंतरही रुग्णांना त्रास उद्भवण्याचा धोका असतो. परंतु, एकीकडे रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे समज करतात, दुसरीकडे कोरोना रुग्ण घरी गेला की, जबाबदारी संपली, अशी अवस्था प्रशासनाची आहे. परिणामी, गंभीर अवस्थेत अनेक रुग्ण परत येतात. प्रशासनाचा वॉच नसल्याने जिल्ह्यात पोस्ट कोविड रुग्ण वाऱ्यावर आहेत.
कोरोनाचे उपचार घेऊन घरी गेल्यानंतर काही रुग्णांना विविध दुखण्यांना सामोरे जावे लागते. अशा रुग्णांसाठी घाटी आणि जिल्हा रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे. घरी गेल्यानंतर दम लागणे, थकवा, सांधेदुखी अशा त्रासाला अनेक रुग्णांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे रुग्णांना पुन्हा उपचाराची गरज भासते. परंतु भीतीपोटी अनेक रुग्ण वेळीच उपचार घेण्याकडे दुर्लक्ष करतात. शिवाय प्रशासनाकडूनही रुग्णांच्या प्रकृतीबाबत आढावाही घेतला जात नाही. त्यामुळे त्रास वाढल्यानंतरच रुग्ण रुग्णालय गाठतात. हा प्रकार रुग्णांच्या जीवावर बेतण्याचा आहे. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर म्हणाले, पोस्ट कोविड रुग्ण येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ज्यांना काही त्रास होतो, असेच रुग्ण येतात.
जिल्ह्यातील एकूण रुग्ण-४५, ३२२
बरे झालेले रुग्ण-४३,६१८
सध्या उपचार घेणारे रुग्ण-५०६
यांनी घ्यावी काळजी
- आयसीयूमध्ये उपचार घेतलेले कोविड रुग्ण.
-उपचार घेताना ऑक्सिजन द्यावा लागलेले रुग्ण.
-कोरोनातून बरे झालेले रुग्ण.
परत येण्याचे प्रमाण कमी
कोरोना रुग्ण परत रुग्णालयात येण्याचे प्रमाण खूप कमी आहे. महिन्याला एखाददुसरा रुग्ण येतो. प्रतिकारशक्ती कमी असलेले हे रुग्ण असतात. रुग्णांनी किमान ३ महिने रक्त पातळ होणारी औषधी सुरू ठेवली पाहिजे. चांगला आहार घेतला पाहिजे.
- डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसीन विभागप्रमुख, घाटी