औरंगाबाद: नव्या शैक्षणिक धोरणानुसार पात्र महाविद्यालये, संस्थांना स्वायत्तता घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने स्वत:च्या विभागांपासून सुरुवात केली आहे. विद्यापीठातील सर्व विभागांची स्वायत्तता दोन वर्षांपूर्वी काढण्यात आली होती. त्यांना पुन्हा शैक्षणिक स्वायत्तता देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या विद्या परिषदेत घेण्यात आल्याचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’वर महाविद्यालय प्राचार्यांशी संवाद साधल्यावर त्यांनी पत्रकारांना माहीती दिली. यावेळी प्र. कुलगुरू डाॅ. श्याम शिरसाठ यांची उपस्थिती होती. शैक्षणिक स्वायत्तता देण्याचा निर्णय विद्या परिषदेने घेतला. मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी, अभ्यासक्रम तयार करणे तो शिकवणे, परीक्षा घेणे यावर अधिष्ठातांची समिती लक्ष ठेवेल, असे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सांगितले.
विद्यापीठाशी ४८५ महाविद्यालये संलग्न असून, केवळ ‘एमआयटी’ आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या स्वायत्त संस्था आहेत. पात्र महाविद्यालये, संस्थांनीही स्वायत्ततेसाठी पुढे यावे. असेही आवाहन त्यांनी केले.
शैक्षणिक श्रेयांक पेढीत विद्यार्थ्यांची नोंदणी आवश्यक- शैक्षणिक श्रेयांक पेढीत विद्यापीठाची नोंदणी झाली आहे. विद्यापीठाने ‘डीजी लाॅकर’मध्ये २ लाख ३४ हजार विद्यार्थ्यांच्या पदवीची नोंदणी केली आहे. या पोर्टलवर विद्यार्थ्यांनीही नोंदणी करणे आवश्यक आहे. आधार कार्ड व ‘पीआरएन’ क्रमांकाच्या मदतीने ही नोंदणी सर्व विद्यार्थ्यांनी करावी, असे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले म्हणाले.
चाॅइस बेस क्रेडिट सिस्टिम- विद्यापीठात २०२२-२३मध्ये ४४ अभ्यासक्रमांत श्रेणी श्रेयांक पद्धत (सीबीसीएस) लागू करण्याचा निर्णय विद्या परिषदेत घेण्यात आला. त्यामुळे विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर पदवीलाही १०० टक्के ‘सीबीसीएस’ पद्धत लागू करण्यात आली. कुठल्याही शाखेत कोणत्याही भाषेत शिकले तरी मातृभाषेत पेपर देण्याची मुभा यावर्षीपासून देण्यात येणार आहे. ‘स्वयं’अंतर्गत ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी यावर्षी रेकाॅर्डब्रेक २०२२ नोंदणी झाली आहे. त्यामुळे ऐच्छिक विषय विद्यार्थ्यांना शिकता येईल. त्याचे ‘क्रेडिट’ विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणात जमा होतील.
आता ‘अंडर ग्रॅज्युएट डिप्लोमा’ अन् ‘पीजी डिप्लोमा’- यावर्षी प्रवेश घेतलेल्यात विद्यार्थ्यांना मल्टीपल एन्ट्री, मल्टीपल एक्झिटची सुविधा देण्यात येणार आहे. पदवीचे शिक्षण घेताना पहिल्या वर्षीचे शिक्षण पूर्ण करून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांना अंडर ग्रॅज्युएट सर्टिफिकेट, दुसऱ्या वर्षी बाहेर पडणाऱ्यांना अंडर ग्रॅज्युएट डिप्लोमा आणि तिसऱ्या वर्षी पदवी, तर पदव्युत्तर शिक्षणात पहिल्या वर्षी बाहेर पडू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पीजी डिप्लोमा आणि दोन वर्षांनंतर ‘पीजी डिग्री’ देण्यात येईल. त्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना आठवडाभरात निर्ममित करू, असे कुलगुरूंनी सांगितले.