औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण विभागच करील. विद्यापीठ परिसरात कोणत्याही प्रकारची चमकोगिरी करणारे बॅनर लावण्यासाठी प्रशासनाची मंजुरी अनिवार्य करण्याचा ठराव व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.
विद्यापीठात सुरू असलेल्या रस्ते कामात बदल करण्याचा ठराव व्यवस्थापन परिषदेत चर्चेत आला होता. तेव्हा सदस्य डॉ. शंकर अंभोरे यांनी विविध पक्ष, संघटनांकडून बॅनरबाजी करण्यात येत असून, त्या माध्यमातून विद्यापीठाचे विद्रुपीकरण होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा विविध सदस्यांनी आक्रमक भूमिका मांडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाहेरील संघटना विद्यापीठाचे बॅनर, सभागृहाचा वापर करून कार्यक्रमाचे आयोजन करतात. संबंधित कार्यक्रम विद्यापीठाचा असल्याचे भासवितात. हे सगळे उद्योग बंद केले पाहिजेत.
जयंत्यांना झेंडे, बॅनर लावले जातात. हे बॅनर, झेंडे महिना महिना तसेच असतात. यातून जातीय, धार्मिक तेढ निर्माण होऊन विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण गढूळ होते. यामुळे यापुढे जे कोणी झेंडे, बॅनर लावतील, त्यांनीच तीन दिवसांच्या आत ते काढले पाहिजेत. जो काढणार नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जावेत.
तसेच महापुरुषांच्या जयंत्यांसह इतर कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण संचालक विभाग करील. इतर कोणत्याही पक्ष, संघटनेचा त्यात सहभाग नसेल, विद्यापीठातील सभागृहेसुद्धा अशा संघटनांच्या कार्यक्रमांना उपलब्ध करून दिली जाणार नाहीत, अशा आशयाचा ठराव व्यवस्थापन परिषदेत सर्वानुमते घेण्यात आला.
मानधन वाढीवर शिक्कामोर्तबविद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधन वाढीसाठी परीक्षा मंडळाने समिती नेमली होती. समितीने इतर विद्यापीठांतील परीक्षेत देण्यात येणाऱ्या मानधनाचा तुलनात्मक अभ्यास करून अहवाल सादर केला होता. हा अहवाल परीक्षा मंडळाने मंजूर केल्यानंतर अंमलबजावणीसाठी व्यवस्थापन परिषदेत डॉ. अंभोरे यांनी ठेवला. त्यास डॉ. राजेश करपे, डॉ. फुलचंद सलामपुरे यांनी अनुमोदन देऊन सर्वानुमते मंजूर करण्यात आला.