औरंगाबाद : आम्ही ५०० निमंत्रितांच्या यादीत तुमचा समावेश केला होता ; पण ओमायक्रॉनमुळे बंधन आल्याने आम्हाला नाईलाजाने आपले नाव वगळावे लागत आहे, क्षमा करावी, तुमच्या उपस्थितीने आणखी आनंद वाढला असता.. पण तुम्ही घरूनच वधू- वराला आशीर्वाद द्या.. त्यांच्या भावी आयुष्यासाठी आपले आशीर्वाद मौल्यवान आहेत... असे संदेश वधू- वर पित्यांकडून नातेवाईक, मित्र, हितचिंतकांच्या मोबाईलवर जात आहेत.
कारण, अनेकांच्या मुला- मुलीचे विवाह जानेवारीत आहेत. त्यांनी ५०० पेक्षा अधिक पत्रिका वाटल्या ; पण उपस्थितीवर निर्बंध आल्याने सर्व नियोजन बिघडले आहे.
बंदिस्त सभागृहात १०० पेक्षा जास्त नकोमंगल कार्यालयात बंदिस्त सभागृहात १०० लोकांपेक्षा जास्त संख्या असता कामा नाही, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यामुळे ज्यांनी १०० पेक्षा अधिक पत्रिका वाटप केल्या आहेत, ते अडचणीत आले आहेत.
खुल्या जागेत ५० टक्के क्षमतालॉनवर म्हणजे खुल्या जागेत २०० किंवा क्षमतेच्या ५० टक्केच लोक असावेत, असे बंधन असल्याने वधू- वराचे वडील जास्त अडचणीत आले आहेत. कारण आधी निमंत्रण दिले, आता येऊ नका म्हणतात, म्हणजे अपमान केला अशी भावना नातेवाईकांमध्ये निर्माण होत आहे.
मंगल कार्यालयांच्या अडचणी वाढल्याआता कुठे लग्न उद्योग रुळावर आला असताना पुन्हा निर्बंध लावण्यात आल्याने मंगल कार्यालय व्यावसायिक अडचणीत आले आहेत. कारण अगोदरच डिपॉझिट घेऊन ठेवले आहे. लोकांची जास्त संख्या झाली तर प्रशासन कारवाई करेल ही भीती आहे, असे मंगल कार्यालयाच्या मालकांनी सांगितले.
वधू- वर पित्यांना धडकीएका वधू पित्याने सांगितले की, ऑक्टोबरमध्ये मी जानेवारीतील लग्नाची तारीख बुक केली होती. ४५० पत्रिका वाटल्या होत्या. मात्र मंगळवारी मंगल कार्यालयाच्या मालकाचा फोन आला. १०० लोक तर आमच्या परिवारातील होतात ; मग कोणाची नावे कमी करावीत, हा यक्षप्रश्न पडला आहे. एका वर पित्याने सांगितले की, माझ्या एकुलत्या एक मुलाचे लग्न थाटात लावावे ही आमची इच्छा. पण आता निर्बंध आल्याने काही जणांना आदल्या दिवशी तर काही जणांना लग्नाच्या दिवशी तर काही जणांना सत्यनारायणाच्या दिवशी बोलाविण्याची तडजोड करावी लागली.