औरंगाबाद : यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार वर्धापनदिनानिमित्त विद्यापीठ गेट परिसरात आंबेडकर अनुयायांची अभिवादनासाठी होणारी गर्दी, विविध पक्ष आणि संघटनांच्या अभिवादन रॅली आणि जाहीर सभांना जिल्हा प्रशासनाने प्रतिबंध घातला. तरीही याठिकाणी रात्री ९ वाजेपर्यंत अनुयायांनी विद्यापीठ गेट, शहीद स्तंभ आणि बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
सकाळी भन्ते नागसेन, भन्ते एस. प्रज्ञाबोधी व भिख्खू संघाकडून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांचे आगमन होताच समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभेच्या स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध संचलन केले. किशोर जोहरे व रमेश बनसोडे यांनी संचलनाचे नेतृत्व केले. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनीही बाबासाहेबांचा पुतळा व शहीद स्तंभास अभिवादन केले.
गुरुवारी पहाटेपासूनच विद्यापीठ गेटजवळ ठेवण्यात आलेल्या तथागत गौतम बुद्ध व बाबासाहेबांच्या प्रतिमांना महिला शिस्तीने वंदन करत होत्या. यावर्षी परिसरात गर्दी व गोंगाट नव्हता. विविध ठिकाणी होणाऱ्या जाहीर सभांच्या जागा ओसाड दिसत होत्या. रस्त्याच्या दुतर्फा पुस्तके, भीम-बुद्ध गीतांच्या ध्वनिफिती, मूर्ती, प्रतिमांची दुकाने नव्हती. दरवर्षी याठिकाणी जत्रेसारखी होणारी गर्दी नव्हती. गेटसमोर विविध पक्ष- संघटना व कार्यकर्त्यांची शुभेच्छा फलकेही तुलनेने कमीच दिसून आली.
विद्यापीठ गेटच्या डाव्या बाजूला उभारलेल्या पोलीस नियंत्रण कक्षातून पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, पोलीस उपायुक्त मीना मकवाना, सहायक पोलीस आयुक्त भापकर, पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस निरीक्षक मनोज पगारे, पोलीस निरीक्षक संभाजी पवार पाहणी करत होते.
चौकट,.....
आंबेडकरी समुदायाकडून शिस्तबद्ध पद्धतीने अभिवादन
रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, राष्ट्रीय सचिव संजीव बोधनकर, पीपल्स रिपब्लिकनचे प्रा. जोगेंद्र कवाडे, जयदीप कवाडे, पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्याध्यक्षा सूर्यकांता गाडे, डॉ. सिद्धांत गाडे, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अण्णासाहेब कटारे, भारतीय कोब्राचे विवेक चव्हाण, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डांबाळे, सुवर्णा डंबाळे, आदींनी बाबासाहेबांचा पुतळा व शहीद स्तंभास अभिवादन केले. रात्री उशिरापर्यंत विविध पक्ष-संघटनांचे कार्यकर्ते व आंबेडकरी अनुयायांनी आपल्या कुटुंबीयासह येऊन शिस्तबद्ध पद्धतीने अभिवादन केले.