छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस विभागाने देखील जय्यत तयारी केली असून कायदा सुव्यवस्थेसह विविध पातळींवर मार्गदर्शक संहिता जारी केली आहे. त्यात प्रामुख्याने पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट, कटआऊट, पेंटिंगवर निर्बंध घालण्यात आले असून परवानगीशिवाय वाहनांवर झेंडेदेखील लावण्यास मनाई असेल. १० जूनपर्यंत हे आदेश लागू असतील, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाकडून १६ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घाेषणा करण्यात आली. त्यानंतर मागील दहा दिवसांपासून पोलिस आयुक्तालयात आयुक्त मनोल लोहिया यांच्या नेतृत्वात बैठकांचे सत्र सुरू आहे. उपायुक्त, सहायक आयुक्तांच्या बैठकीत सातत्याने सुरक्षा व तयारींचा आढावा घेतला जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने बीएसएफची एक तुकडी शहरात दाखल झाली असून एसआरपीएफसह बाहेरूनही पोलिसांचा मोठा फौजफाटा लवकरच शहरात दाखल होणार आहे. पोलिस अधिनियमान्वये पोलिस आयुक्त लोहिया यांनी नुकतेच मनाई आदेश जारी केले.
आदेशानुसार: -निवडणूक प्रचारासाठी व्यक्तिगत जागा, इमारत, आवार, भिंतीचा वापर परवानगीशिवाय करता येणार नाही.-सकाळी ६ वाजेपूर्वी व रात्री १० वाजेनंतर कोणत्याही वाहनाद्वारे ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये. त्यापूर्वी पोलिसांची परवानगी आवश्यक.-पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट, कटआऊट, पेंटिंग, होर्डिंग, कमानी, घोषवाक्य लिहिण्यावर निर्बंध.-प्रचारादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, विश्रामगृहे, पोलिस आयुक्त कार्यालय, पोलिस आयुक्त परिमंडळ कार्यालयांच्या इमारत, आवार व परिसरात करता येणार नाही.-उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन दाखल करताना कार्यालय परिसरात मिरवणूक, सभा घेणे, घोषणा देणे, वाद्य वाजवण्यावर निर्बंध, तसेच कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात तीनपेक्षा जादा वाहने आणता येणार नाहीत.-निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चा, निदर्शने, आंदोलनास मनाई.- परवानगीशिवाय वाहनांवर झेंडे, बॅनर लावण्यास निर्बंध.
रात्री कडेकोट तपासणीनिवडणुकीत अनुचित प्रकार, कुठलीही अवैध तस्करी टाळण्यासाठी पोलिसांचे लक्ष राहणार आहे. रात्रीदेखील नेहमीपेक्षा अधिक गांभीर्याने गस्त घालून आवश्यक वेळी नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.