औरंगाबाद : कोरोना लस घेतल्यानंतर शनिवारी ३५२ पैकी ९० आरोग्य कर्मचाऱ्यांना रिॲक्शनचा सामना करावा लागला. त्यामुळे लस घेण्यासाठी आरोग्य कर्मचारी पुढे यायला तयार नाहीत. मंगळवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तब्बल ५०० कर्मचाऱ्यांना लगेच लस घेण्यासाठी निरोप पाठविले. त्यातील फक्त २७२ कर्मचाऱ्यांनी लस घेतली. लस घेणाऱ्यांचे प्रमाण अचानक घटल्याने महापालिकेकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
शनिवारी पहिल्याच वेळी कोविन ॲप बंद पडले. मागील तीन दिवसांपासून ॲप सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले मात्र त्यात यश आले नाही. पहिल्या दिवशी ५०० पैकी ३५२ लसीकरण झाले. लसीकरण झालेल्या ९० लाभार्थ्यांना रिअॅक्शनचा सामना करावा लागला. त्यामुळे महापालिकेने तातडीने लसीकरण केंद्र शहरातील पाच मोठ्या खाजगी रुग्णालयांमध्ये शिफ्ट केले. मंगळवारी सकाळपासूनच लाभार्थ्यांना लस घेण्यासाठी बोलावण्याची कसरत सुरू झाली. ५०० पैकी २७२ लाभार्थी आले आणि त्यांनी लस घेतली. एमजीएम, धूत, बजाज, हेडगेवार, मेडीकव्हर या पाच खासगी रुग्णालयात लस देण्यात आली. त्यात धूत हॉस्पिटल ६६, बजाज ४०, एमजीएम ५३, हेडगेवार ५९, मेडीकव्हर ५४ याप्रमाणे लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. या लसीकरण मोहिमेला निम्मा प्रतिसाद मिळाला.
ॲप बंद पडल्याने प्रचंड त्रासकोरोना लसीकरणासाठी कोविन अॅप वारंवार हँग होत असल्याने लाभार्थ्यांना निरोप पाठविण्यास अडचणी येत आहेत. यातून मार्ग काढण्यात आला असून पाचशे लाभार्थ्यांची यादी तयार करुन त्यांना निरोप दिले जात आहेत. बुधवारी निरोप दिलेल्या लाभार्थ्यांना लस दिली जाणार असल्याचे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
आशा स्वयंसेविकांनी दिला नकारदोन आशा स्वयंसेविकांनी लस घेण्यास नकार दिल्याचा प्रकार घडला. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्या लस घेतील; पण त्या नकारावर ठाम राहिल्या तर लस दिली जाणार नाही, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.