उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल २४ आॅगस्ट रोजी जाहीर झाला. या परीक्षेसाठी जिल्हाभरातील १ हजार ३३२ विद्यार्थी बसले असता ४२० जण उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेचे प्रमाण ३१.५३ टक्के एवढे आहे.दहावी, बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये, म्हणून पुरवणी परीक्षा घेण्यात येते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने ९ ते २९ जुलै या कालावधीत पुरवणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्हाभरातील १०७ कॉलेजमधून १ हजार ३४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षेला १ हजार ३३२ जण बसले. यामध्ये १ हजार ३८ पैकी १०३० मुले तर ३०५ पैकी ३०२ मुली अशा एकूण १ हजार ३३२ जणांनी परीक्षा दिली. सदरील परीक्षेचा आॅनलाईन निकाल २४ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता जाहीर झाला असता केवळ ३१.५३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये २९९ मुले तर १२१ मुली अशा ४२० जणांचा समावेश आहे. पुरवणी परीक्षेतही मुलींचेच वर्चस्व असल्याचे दिसून येते. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४०.७ टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २८.०३ टक्के एवढे आहे. (प्रतिनिधी)
पुरवणी परीक्षेचा निकाल ३१ टक्के
By admin | Published: August 25, 2016 12:50 AM