औरंगाबाद : कांचनवाडी येथील वुडरीज हायस्कूलची चाैकशी सुरू असेपर्यंत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण पुन्हा सुरू करावे. मागील वर्षीचा राखून ठेवलेला निकाल देण्याचे आदेश शाळा व्यवस्थापनाला द्यावे. तसेच प्रवेश फी म्हणून आतापर्यंत पालकांकडून वसूल केलेली रक्कम दंडासह परत करण्याची मागणी वुडरीज हायस्कूलच्या पालकांनी विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
५१ पालकांनी एकत्र येत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात मंगळवारी उपसंचालक साबळे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. विद्यार्थी व पालकांना न्याय देण्याची मागणी केली. अन्यथा उपोषणाचा इशारा पालकांनी दिल्याचे संघटनेचे उदयकुमार सोनुने यांनी सांगितले.
निवेदनात म्हटल्यानुसार, लाॅकडाऊनमुळे शैक्षणिक वर्ष २०२० - २१मध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण घेतले. पहिल्या लाॅकडाऊनमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण शाळेकडून दिले गेले नाही. ऑगस्ट २०२०मध्ये शाळेने वर्ग सुरू केले. मात्र, पूर्ण फी देण्याची मागणी शाळेकडून होत आहे. आतापर्यंत शाळेने पालक - शिक्षक संघाची कार्यकारी समितीची स्थापना नियमानुसार केलेली नाही. चुकीचा हिशेब दाखवून वेळोवेळी अन्यायकारक फी वाढ केली आहे. शाळा २०१५ व २०२० मध्ये शिक्षण विभागाने केलेल्या चाैकशीत दोषी आढळली आहे. अवैधरित्या शाळेने वसूल केलेल्या शुल्काबाबत शाळेची लेखापरीक्षकांकडून चाैकशी करण्यात यावी. तसेच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलेल्या चाैकशीच्या आदेशाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही ती करावी, अशी मागणी केली आहे. यासंबंधी शाळेचे उपप्राचार्य योगेश ब्रम्हपुरीकर यांनी फोनवर यासंबंधी कुठलीही प्रतिक्रिया देता येणार नसल्याचे सांगितले.