- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : ‘हॅलो, मी मंगल कार्यालयातून बोलतोय.. तुम्ही मुलीच्या लग्नासाठी आमच्या मंगल कार्यालयात बुकिंग केली. नवीन आदेशाप्रमाणे तुम्हाला २०० ऐवजी आता ५० लोकांच्याच साक्षीने मुलीचे लग्न करावे लागेल. तुम्ही पुढील नियोजन करा, हे सांगण्यासाठी फोन केला,’ असा फोन आज अनेक मंगल कार्यालयांतून वधू-वराच्या घरी जात आहे. हा निरोप ऐकून, कोणाल यादीतून वगळायचे, असा यक्षप्रश्न पडला आहे.
कालपर्यंत मंगल कार्यालयातील क्षमतेपेक्षा निम्म्या लोकांना लग्न सोहळ्यात परवानगी देण्यात येणार, असे सांगितले जात होते; पण मंगळवारी महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पडळकर यांनी मंगल कार्यालय मालकांची बैठक घेऊन त्यांना वरील आदेश दिला आहे. मंगल कार्यालय, लॉन्स संघटनेतर्फे सांगण्यात आले की, शहरात मंगल कार्यालय व लॉन्सची संख्या १५० आहे. प्रत्येक कार्यालयातील नोव्हेंबर व डिसेंबरमधील १० तारखा बुक झाल्या आहेत. म्हणजे डिसेंबर अखेरपर्यंत शहरात १,५०० लग्नसोहळे पार पडणार आहेत.
मंगल कार्यालये घेताहेत काळजीप्रशासनाने आदेशानुसार मंगल कार्यालयात ५० जणांना परवानगी देण्यात येणार आहे. वय वर्षे १० ते ६५ वर्षाच्या वऱ्हाडींना प्रवेश दिला जाईल. मंगल कार्यालय फवारणी, वऱ्हाडींना सॅनिटायझर , थर्मलगनने तपासणी होईल.
ऐन लग्नसराईच्या तोंडावर लग्नात फक्त ५० जणांना परवानगी असणार आहे, असा प्रशासनाने आदेश दिला आहे. वधू व वर पित्यांनी धावपळ उडाली आहे. २०० जणांना पत्रिका दिली त्यातील १५० जणांना लग्नाला येऊ नका कसे म्हणायचे, असा प्रश्न पडला आहे. तसेच मंगल कार्यालय मालकांचे व केटरिंग व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.- सुमीत कुलकर्णी, मंगल कार्यालय मालक
आधी मंगल कार्यालयाच्या क्षमतेपेक्षा निम्म्या लोकांना प्रवेश देणार अशा बातम्या आल्या होत्या. त्यानुसार मंगल कार्यालय चालकांनी तयारी केली होती. मात्र, आता फक्त ५० लोकांना परवानगी दिल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. २०० ते ३०० लोकांना परवानगी देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. - प्रशांत शेळके, अध्यक्ष, मंगल कार्यालय, लॉन्स असोसिएशन
जानेवारी, मे महिन्यांत जास्त लग्नतिथी महिना लग्नतिथीनोव्हेंबर २७,३० डिसेंबर ७,८,९,१७,१९,२३,२४,२७.जानेवारी ३,५,६,७,८,९,१०,१८,१९,२०,२१. २४,२५,३०.फेब्रुवारी १,२,३,४,८,२१,२२,२६,२७,२८.मार्च २,३,५,७,९,१०,१५,१६,३०.एप्रिल २२,२४,२५,२६,२८,२९,३०.मे १,२,३,४,५,८,१३,२०,२१,२२,२४,२६, २८,३०,३१. जून ४,६,१६,१९,२०,२७,२८.जुलै १,२,३,१३.