औरंगाबाद : वाळूजमध्ये दोन दिवसांपूर्वीच लस मिळविण्यासाठी चेंगराचेंगरी झाली होती. बुधवारी प्रोझॉन मॉलच्या परिसरात ३०० नागरिकांना लस डोस देण्यासाठी मनपाने नियोजन केले होते. मात्र, येथे लांबलचक रांगा लागल्या. अक्षरश: रेटारेटी करण्यात आली. सुदैवाने कोणतीही मोठी घटना घडली नाही. महिला व पुरुषांसाठी एकच रांग होती. लस न घेताच परत जावे लागल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
महापालिकेकडे केवळ ३५० लस डोस शिल्लक होते. त्यामुळे प्रोझोन मॉल येथील पार्किंगमध्ये ड्राईव्ह इन आणि पायी आलेल्या नागरिकांसाठी असे दोन लसीकरण केंद्र लावण्यात आले होते. लसीकरणाची वेळ सकाळी १० ची असल्याने नागरिकांनी गर्दी केली. तसेच दुसऱ्या बाजूला कारच्याही रांगा लागल्या होत्या. प्रत्यक्षात दुपारी १ वाजता लसीकरणाला सुरुवात झाली. तोपर्यंत नागरिकांची रेटारेटी सुरू होती. ड्राईव्ह इनच्या माध्यमातून लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना लस मिळालीच नाही. दुसरीकडे पायी आलेल्या नागरिकांना दीडशे कूपन वाटप करण्यात आले. ज्यांना कूपन मिळाले नाही, त्यांना घरी जावे लागले.