औरंगाबाद: कोरोनामुळे लेखा व कोषागारे विभागाने सेवापुस्तिका पडताळणी ३१ मे पर्यंत थांबविली आहे. त्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्ण पेन्शनसाठी वाट पहावी लागणार आहे. ८० टक्के तात्पुरत्या (प्रोव्हिजनल) पेन्शनमध्ये सेवानिवृतांना भागवावे लागणार आहे. पूर्ण पेन्शन हाती पडण्यासाठी त्यांना पुस्तिका मंजुरीची वाट पहावी लागेल.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १७ ते ३१ मे २०२१ या कालावधीत वेतन पडताळणी पथकाकडे सेवा पुस्तके पडताळीणीसाठी स्वीकारणे व पडताळणी झालेली सेवापुस्तके वितरण करणे बंद करण्यात आले आहे. मात्र कार्यालयात जमा झालेल्या सेवापुस्तकांच्या पडताळणीचे काम सुरू राहणार आहे. १ मे २०२१ नंतर सेवापुस्तकांच्या आवक-जावक बाबत तत्कालीन परिस्थितीचा विचार करून घेतलेल्या निर्णयाबाबत कळविण्यात येईल, असे लेखा व कोषागारे सहायक संचालक सोनकांबळे यांनी कळविले आहे.
लेखा व कोषागारे कार्यालयातील बहुतांश कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने कर्मचारी कमी आहेत. परिणामी सेवापुस्तिका पडताळणीला गती मिळत नाही. ७५० पुस्तिका सध्या प्रलंबित आहेत. त्या मे अखेरपर्यंत पूर्ण होतील. मे २०१९ पासून २८ हजार सेवापुस्तिका मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतरही संचिका निकाला काढल्या. वेतनपडताळणी विभाग, ट्रेझरी आणि एजी ऑफीस नागपूर असा सेवापुस्तिकांचा प्रवास असतो. यामुळे वित्त विभागाने आजवर तीन निर्णय घेतले आहेत. तीन महिने, सहा महिने आणि आता १ वर्ष प्रोव्हिजनल पेन्शन देण्याचा निर्णय झाल्यामुळे संचिका मंजूर होईपर्यंत सेवानिवृत्तांना पेन्शन मिळते. ८० टक्क्यांच्या आसपास ही पेन्शन असते. तिन्ही कार्यालयात प्रकरणे प्रलंबित असतातच. सातव्या वेतन आयोगामुळे सेवापुस्तिका पडताळणीचे काम वाढले आहे. असे सूत्रांनी सांगितले.
चौकट...
कोरोनामुळे कामकाजावर परिणाम
वरिष्ठ सूत्रांनी सांगितले, कार्यालयात गर्दी खूप होत आहे. गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. सेवापुस्तिका तपासणी सुरू आहे. सध्या बाहेर जिल्ह्यातून येथे येण्यास बंदी आहे. रोज १५ ते ३० पुस्तिका येण्याचे प्रमाण आहे. महिन्याभरात ८०० ते १ हजारांपर्यंत पुस्तिका तपासून पुढे पाठविण्यात येत आहेत. डिसेंबर २०२१ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलपर्यंत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पुस्तिका जमा झाल्या आहेत. काही कार्यालयांनी पुस्तिका लवकर जमा केल्या, काही कार्यालयांनी उशिरा जमा केल्या आहेत. हे सगळा परिणाम कोरोनामुळे झाला आहे.