औरंगाबाद, दि. २ : सहकुटुंब बंगल्यात झोपलेल्या कृषी अधिका-याचे घर फोडून चोरट्यांनी १२ तोळ्याचे सोन्याचे अलंकार, अर्धा किलो चांदी आणि रोख १ लाख ३० हजार रुपये चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. १) मध्यरात्री दिड वाजे दरम्यान व्यंकटेशनगरात घडली. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
याविषयी अधिक माहिती अशी की,कृषी विभागातील निवृत्त अधिकारी अंकुश गुलाबराव कोलते(६५) यांचा व्यंकटेशनगरमध्ये सहा रुमचा बंगला आहे. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे कोलते पती-पत्नी, मुलगा अनुपकुमार,सून, विवाहित मुलगी आणि वृद्ध आई असे सर्वजण आपआपल्या खोलीत झोपले. आॅस्ट्रेलियातून आलेल्या त्यांच्या आर्किटेक्ट मुलीने रात्री दिडपर्यंत लॅपटॉपवर काम केले. त्यांनतर ती दुस-या खोलीत झोपण्यासाठी गेल्या.
चोरट्यांनी मध्यरात्री दीडच्या सुमारास बंगल्यातील सर्वात मागील एका बेडरूमध्ये त्यांचे लोखंडी कपाट, लाकडी आलमारी आहेत. या बेडरुमच्या खिडकीच्या लोखंडी ग्रीलचे स्क्रू काढून ती खाली ठेवली. यानंतर त्या खिडकीतून त्यांनी रूममध्ये प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी त्या रूममधून स्वयंपाक घरात जाणा-या उघड्या दरवाजाची कडी लावली. तर दुस-या खोलीचा दरवाजा आतून लागत नसल्याने त्यांनी दरवाजा लोटून त्यामागे सुटकेस ठेवली.
यानंतर चोरट्यानी लोखंडी कपाट उघडून त्यातील सामान अस्ताव्यस्त फेकले. या कपाटात मौल्यवान वस्तू नव्हती. वेगवेगळ्या लाकडी कपाटापैकी एकाला लॉक असल्याचे चोरट्याच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी ताकद लावून त्या कपाटाचे पट ओढल्याने लॉक निखळले. या कपाटात ठेवलेले रोख १ लाख ३० हजार रुपये, सोन्याचे गंठण, मिनी गंठण, मनी मंगळसुत्र असा सुमारे १२ तोळ्याचे दागिने आणि चांदीचे ग्लास,वाटी आणि इतर चांदीचे अलंकार अशी एकूण अर्धा किलो चांदी चोरून नेली. यानंतर चोरटे त्या खिडकीतूनच तेथून निघून गेले.
सकाळी सहा वाजता घटना उघडकीसनेहमीप्रमाणे कोलते कुटुंब सकाळी सहा वाजेच्या सुमारास झोपेतून उठले. तेव्हा ते स्वयंपाक खोलीतून मागील बेडरूमकडे जाऊ लागले तेव्हा बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे त्याना समजले. यामुळे त्यांनी अनुप याच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यास उठवले. अनुपने त्याच्या खोलीतून मागील बेडरूमकडे गेला तेव्हा त्याच्या खोलीचा दरवाजाही लोटलेला दिसला.त्यांनी जोर लावून दरवाजा लोटला तेव्हा चोरट्यांनी खिडकीची ग्रील काढून चोरी केल्याचे नजरेस पडले.