लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कामगारांना कंपनीत घेऊन जाणाºया भरधाव खाजगी बसने मॉर्निंग वॉक करणाºया सेवानिवृत्त मुख्याध्यापकास चिरडले. या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गारखेडा ते सूतगिरणी चौक रोडवरील एका हॉॅटेलजवळ घडली.पैली वरकी वारचाला (६८, रा. नाथ प्रांगण, गारखेडा) असे मृताचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, पैली वरकी वारचाला हे जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस शाळेचे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेले आहेत. ते रोज सकाळी नियमित फिरायला जात असत. नेहमीप्रमाणे आज सकाळी डोक्यावर मंकी टोपी आणि चष्मा लावून मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. कधी ते विभागीय क्रीडा संकुल येथे तर कधी रस्त्याने फिरत. आज सकाळी ते घरापासून निघाल्यानंतर सूतगिरणी चौकमार्गे गारखेडा गावापर्यंत आले. यानंतर तेथून वळण घेऊन पुन्हा घराच्या दिशेने निघाले. यावेळी कामगारांना घेऊन जाणाºया भरधाव बसचालकाने त्यांना उडविले. हा अपघात एवढा भीषण होता की, ते उंच उडून रस्त्यावर पडले आणि बसच्या चाकाखाली आले. या घटनेत ते घटनास्थळीच गतप्राण झाले. अपघाताची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रस्त्यावर निपचित पडलेल्या पैली यांचे प्रेत घाटीत दाखल केले. घटना पुंडलिकनगर ठाण्यांतर्गत येत असल्याने पोलिसांनी बस पुंडलिकनगर ठाण्यासमोर नेऊन उभी केली. याविषयी बोलताना पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज म्हणाले की, आरोपी बसचालक सुनील सुभाष सर्जे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तो घटनास्थळावरून पसार झाला. तपास पोहेकॉ. एकनाथ राठोड करीत आहेत.
निवृत्त मुख्याध्यापकाला खाजगी बसने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 12:24 AM