औरंगाबाद : दहा वर्षांपूर्वी बंद पडलेले मोहाडी (ता. कन्नड) येथील महाविद्यालय पुन्हा सुरू करण्यासाठी जोरदार हालचाली करण्यात येत आहेत. यासाठी भाजप नेते व माजी महापौर बापू घडामोडे प्रयत्न करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बंद पडलेल्या महाविद्यालयाल कुलगुरू डॉ. बी. ए . चोपडे यांनी सोमवारी भेट दिल्याचेही समजते. या विषयाचा ठराव शनिवारी होणा-या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ऐनवेळी येण्याची शक्यता आहे.
२००१ मध्ये सातपुडा विकास मंडळ (ता. रावेर) संस्थेने मोहाडी येथे वरिष्ठ कला महाविद्यालय सुरू केले होते. हे महाविद्यालय २००६-०७ मध्ये बंद पडले. त्यामुळे विद्यापीठाने २००६ ते २०११ आणि २०११ ते २०१६ च्या बृहत आराखड्यात सतत दहा वर्षे नवीन महाविद्यालयासाठी तरतूद केली. त्यानुसार २८ एप्रिल २०१४ मध्ये ग्रामीण विकास प्रसारक मंडळाच्या पद्मावती कला व विज्ञान महाविद्यालयाला परवानगी देण्यात आली. यानुसार हे महाविद्यालय सुरू झाले. बंद पडलेले वरिष्ठ कला महाविद्यालय सुरू करण्यासाठी ‘सातपुडा’ संस्थेने जून २०१६ मध्ये प्रयत्न केले. यासाठी विद्यापीठातील काही अधिकारी आणि भाजपच्या बड्या नेत्यांना हाताशी धरले.
८ जून २०१६ ला ‘सातपुडा’ संस्थेने पुनर्संलग्नीकरणासाठी विद्यापीठाकडे अर्ज केला. याच वेळी मागील पाच वर्षांचे संलग्नीकरण शुल्कदेखील एकदाच भरले. विद्यापीठानेही ते शुल्क नियमबाह्यरीत्या स्वीकारल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले. यानंतर तत्कालीन उपकुलसचिवांनी १७ जून २०१६ रोजी संलग्नीकरण समिती नेमली. या सर्व प्रक्रियेत तत्कालीन बीसीयूडींना अंधारात ठेवले होते. संलग्नीकरण समितीनेही दहा वर्षांपासून बंद असलेले महाविद्यालय पुन्हा सुरू करण्यासाठी सकारात्मक अहवाल दिला. या सर्व प्रकरणाचा ‘लोकमत’ने ८ आॅक्टोबर रोजीच्या अंकात भंडाफोड केला. तेव्हा महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव गुंडाळून ठेवण्यात आला. मात्र ‘सातपुडा’चा संस्थाचालक आगामी काळातील निवडणुकीमध्ये फायदेशीर ठरणार असल्यामुळे भाजपच्या बड्या नेत्याने हे महाविद्यालय पुन्हा सुरू करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनावर वरिष्ठस्तरावरून दबाव आणल्याचे समोर आले आहे. यातूनच कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी मोहाडीच्या महाविद्यालयाला सोमवारी भेट दिली. कुलगुरूंसोबत भाजपचे नेते व औरंगाबादचे माजी महापौर बापू घडामोडे होते.
आज व्यवस्थापन परिषदेची बैठकविद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक सुटीच्या दिवशी शनिवारी (दि.१३) आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये विविध विषय मांडण्यात आलेले आहेत. यामध्ये मोहाडीच्या कॉलेजचा विषय ठेवण्यात आलेला नाही. मात्र हा विषय ऐनवेळी येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.