औरंगाबाद : मराठवाड्यात परतीच्या पावसाने दाणादाण उडविली आहे. मागील सात दिवसांत ३४ मंडळात अतिवृष्टी झाली असून, सोमवारी सकाळपर्यंत १० मंडळात ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंदविला गेला आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील शिल्लक पिकांचा चिखल हाेऊ लागला आहे. शेतकऱ्यांना दोन टप्प्यात शासनाने नुकसान भरपाई दिली असली तरी शेतीचे यंदा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहेविभागात ४५० पैकी २८५ मंडळात यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाली आहे. विभागातील निम्न दुधना वगळता सर्व ११ प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा होत आहे. ८७५ लघु व मध्यम प्रकल्पांत सध्या ९० टक्के जलसाठा आहे.
ऑक्टोबर महिन्यात आजवर मराठवाड्यात ९५ मि.मी. पाऊस झाला आहे. विभागाच्या ६७९ वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत ७७१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या तुलनेत ११३ टक्के असून, गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत १ हजार १०८ मि.मी. पाऊस झाला होता. मराठवाड्यासह राज्यात १८ ऑक्टोबरपर्यंत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यांत गारपीट, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडतो आहे.
मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस होत असल्याने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून जात आहेत. जून, जुलै व ऑगस्ट महिन्यांतील अतिवृष्टीतून वाचलेली पिके आता या परतीच्या पावसामुळे धोक्यात आली आहेत. सरकारने आतापर्यंत १,६०८ काेटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी दिली आहे.
१७ ऑक्टोबर रोजी या ठिकाणी अतिवृष्टी१७ ऑक्टोबर रोजी औरंगाबादमध्ये फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा मंडळात ७० मि.मी., जालना जिल्ह्यात राजूर, केदारखेडा, जाफराबाद, कुंभारझरी, रामनगर, टेंभुर्णी या सर्व मंडळात प्रत्येकी ७५ मि.मी. पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील गंगामसला मंडळात ७९, तर केजमधील नांदूरघाट मंडळात ६६ मि.मी. पावसाची नोंद झाली. उस्मानाबादमधील केशगाव मंडळात ६६ मि.मी. पाऊस बरसला. विभागात ७ ऑक्टोबर रोजी सकाळपर्यंत १४ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली होती. त्यानंतर ८ ते १३ ऑक्टोबरदरम्यान १० मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली होती.