औरंगाबाद : मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावाकडून पैसे मिळणे दुरापास्त बनले आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण बंद करून गावी परतण्याशिवाय पर्याय राहणार नाही. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने किमान दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे, अशी मागणी एनएसयूआयतर्फे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. विद्यापीठाने नुकत्याच सुरू केलेल्या पदवी परीक्षांना ३ लाख ७ हजार विद्यार्थी बसले आहेत. या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य डॉ. जितेंद्र देहाडे, युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष नीलेश अंबेवाडीकर, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष मोहित जाधव, उपाध्यक्ष अक्षय जेवरीकर, विद्यापीठ प्रमुख योगेश बहादुरे, गणेश आढाव, सूर्यकांत नाईक, हनुमंत सरवदे, योगेश वाघ, संभाजी मोरे, आजिनाथ लहाने, दामू वसावे, हन्सी भाई आदी उपस्थित होते.