औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बॅचलर आॅफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (बीसीए) अभ्यासक्रमाला नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या पदव्या अखेर परत घेतल्या आहेत, तशी माहिती स्वत: कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी दिली.‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या नापास विद्यार्थ्यांच्या पदव्या वाटप प्रकरणावर कुलगुरू चोपडे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘लोकमत’कडून माहिती कळल्यानंतर पाच मिनिटांमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली. फक्त बीसीएच्या पदव्यांमध्येच ही गडबड झाल्याचे समोर आले. महाविद्यालयात पाठविलेल्या सदोष पदव्या, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एका दिवसात जमा केल्या. आता कुणाकडेच सदोष पदवी प्रमाणपत्र नाही, तसेच विद्यापीठ अध्यादेश १०१ नुसार कोणतेही सदोष प्रमाणपत्र दुरुस्त करण्याचा, त्यात बदल करण्याचा अधिकार विद्यापीठाला आहे. चुकून एखाद्या विद्यार्थ्याला सदोष पदवी प्रमाणपत्र दिल्याचे यापुढेही लक्षात आलेच, तर ते रद्द करण्यात येईल, असेही डॉ. चोपडे यांनी स्पष्ट केले.या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीत व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे आणि अधिष्ठाता डॉ. मजहर फारुकी यांचा समावेश आहे. ही समिती दोन दिवसांत अहवाल सादर करील.>सहा जणांना कारणे दाखवाडॉ. दिगंबर नेटके, उपकुलसचिव हेमलता ठाकरे, कक्ष अधिकारी पोपट निकम, भगवान फड, वरिष्ठ सहायक राजू गायकवाड आणि विनोद जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी सांगितले.>नैतिक जबाबदारी स्वीकारून माफी मागतोविद्यापीठाने पहिल्यांदाच पदवी प्रमाणपत्राच्या छपाईचे आउटसोर्सिंग करण्याचा निर्णय घेतला. हा आदेश परीक्षा विभागाला ६ मे रोजी मिळाला. दीक्षान्त सोहळा १५ मे रोजी होता. संबंधित कंपनीला पदव्या छापण्याची दिलेली वर्कआॅर्डर आणि दीक्षान्त सोहळ्यात अवघा सात दिवसांचा कालावधी होता. यामुळे कंपनीकडे पाठविलेल्या २६४ अभ्यासक्रमांपैकी एका बीसीएच्या डेटात तांत्रिक चूक झाली. यामुळे विद्यापीठाची जी बदनामी झाली, त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मराठवाड्यातील जनतेची माफी मागतो.- डॉ. दिगंबर नेटके, परीक्षा संचालक
नापासांना दिलेल्या पदव्या घेतल्या परत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 5:29 AM