छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राच्या राजकारणात परत येणार ही फक्त चर्चाच आहे. सध्या तरी कोणतीही माहिती माझ्यापर्यंत आलेली नाही, असे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर गडकरी राज्यात परततील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र त्याबाबत गडकरी यांनी अधिक बोलण्याचे टाळले. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या नागरी सत्कारासाठी गडकरी येथे आले होते. केम्ब्रिज चौकातील मैदानात गडकरी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी मंचावर गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, आ. विक्रम काळे, आ. प्रशांत बंब, महंत सुधीरदास महाराज, उद्योजक विवेक देशपांडे, राम भोगले, विजया रहाटकर आदींची उपस्थिती होती.
राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले. माझ्यासारखे मंत्री झाले. यात कायकर्ते, स्वयंसेवक, प्रचारकांचा त्याग आहे. राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही. जाती-पातीचे राजकारण न होता समाजातील शोषित पीडितांचा विकास करण्यासाठी राजकारण हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.