पैठण (औरंगाबाद): हायटेक युगातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे तब्बल ४७ वर्षांच्या प्रदिर्घ कालावधीनंतर साठी ओलांडलेल्या ५२ बालसवंगडयांची पुन्हा शाळेत भेट झाली. व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हा योग जुळून आला. पैठणच्या जिल्हा परिषद शाळेतील १९७५ सालच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी शनिवार रविवार असे दोन दिवसिय स्नेहसंमेलन सहकुटुंब उत्साहात साजरे केले. आणि पौगंडावस्थेतील ५ दशकांपूर्वीच्या आठवणी जागवत 'साठी' ऊलटलेले वर्गमित्र 'फ्लॅशबॅक' मध्ये रमून गेले !
१९७० च्या दशकात जायकवाडी धरणाच्या उभारणीची प्रक्रिया चालू होती. अभियंते, विविध प्रशासकीय खात्यांचे अधिकारी व पोलीस अधिकारी यावेळी येथे कर्तव्यावर होते. प्राथमिक शाळेतील शिक्षणासाठी त्यांच्या पाल्यांना त्याकाळी जिल्हा परिषद शाळा (मुलांची) हाच पर्याय होता. तेथील १९७५ साली शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी नंतर पालकांसोबत महाराष्ट्रात अन्यत्र शिक्षण घेतले. वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर केले.
पैठण शहरातील १० ते १५ स्थानिक वर्गमित्र संपर्कात होते. या पार्श्वभूमीवर ६ महिन्यांपूर्वी १९७५ चे विद्यार्थी तथा नगर परिषद निवृत्त अधिकारी सुरेश दाणापुरे, औरंगाबाद येथील प्रसिद्ध डॉक्टर अनंत कडेठाणकर, व्यवसायिक श्रीराम आहुजा, वासुदेव हरकारे व पत्रकार बद्रिनाथ खंडागळे यांनी एक व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून उर्वरीत वर्गमित्रांचा शोध सुरू केला. या माध्यमातून जवळपास ५० पेक्षा जास्त मित्रांचा संपर्क झाला. दि. ३० व ३१ जूलै दरम्यान दोनदिवसीय सहकुटुंब स्नेहसंमेलन करण्याचे निश्चित केले. त्यानुसार हा आगळावेगळा उपक्रम साजरा करण्यात आला.
या संमेलनात तत्कालीन शिक्षक बंडेराव जोशी हे हजर होते. निजामकालीन इमारतीत आजही जिल्हा परिषद शाळा (मुलांची) कायम आहे. मुख्याध्यापक अंकुश दाढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास निवृत्त गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम दिवंगत शिक्षक आणि वर्गमित्र यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. स्मरणीका व स्मृतीचिन्ह यांचे प्रकाशन करण्यात आले. मुंबई, पुणे, नांदेड व औरंगाबाद येथून आलेल्या वर्गमित्रांनी मनोगत व्यक्त केले. दोन दिवस आठवणी जागवत भेटीगाठी घेतल्या.
यावेळी प्रामुख्याने डॉ. अनंत कडेठाणकर, डॉ. संजय देशमुख, मधुकर वैद्य, वासुदेव हरकारे, गिरीश बिडकर, मदन जव्हेरी, देविदास चोभे, निवृत्त फौजदार सय्यद आसिफ, राम आहुजा, ऊदय सातारकर, सुरेश दानापुरे, बद्रिनाथ खंडागळे, विनायक कुलकर्णी, चंद्रशेखर गोसावी, दिलीप कबाडे, बापू रोडे, राजु लोहिया, एकनाथ देशमुख, महेश खोचे, उज्वल जोशी, सुधाकर डोळस, चंदन शिंगवी, प्रशांत भुसारी, भरत शर्मा, लक्ष्मण लाड, सर्जेराव सोनवणे, विजय टाक, अनिल चौधरी, संजय पाटील, सतीश वैद्य, अनिल कुलकर्णी, उपेंद्र मुधलवाडकर, सुरेश शिंदे, दत्ता साळजोशी, बंडू जोजारे, गंगासिंग ठाकूर, सुधीर येरंडे, नामदेव लोंढे, राजेंद्र टाक, शिवनारायण जाजु, भारत आठवले, सोमनाथ वरकड, प्रदीप राजपूत, अंकुश टाक व काकासाहेब लबडे आदी वर्गमित्र उपस्थित होते.