औरंगाबाद : महाविद्यालयात शिक्षण घेताना झालेली मैत्री तोडल्यामुळे सॉफ्टवेअर अभियंत्याने सोशल मिडियावर तरुणीची बनावट प्रोफाईल तयार करीत बदनामी केली. या प्रकरणात सायबर पोलिसांनी अभियंत्याला बेड्या ठोकत अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली.
योगेश विश्वभंर लाळे (२४) असे आरोपीचे अभियंत्याचे नाव आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना झालेल्या मैत्रीत योगेश व पीडित विद्यार्थिनीचे वाद झाले. त्यातुन तरुणीने मैत्री तोडून टाकली. त्याचा राग धरत सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या योगेशने दीड वर्षांपासून तरुणीचा पाठलाग केला. जवाहरनगर ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्याने तरुणीला फोन करणे, मेसेज करण्यासह वेबसाईटवर बनावट प्रोफाईल तयार करुन बदनामी करणे सुरुच केले. शेवटी तरुणीने सायबर पोलीस ठाणे गाठले. त्याठिकाणी गुन्हा नोंदविल्यानंतर निरीक्षक पातारे यांनी तांत्रिक विश्लेषण करीत आरोपी शोधला.
योगेश हा पुण्यात होता. तेथून निरीक्षक पातारे, उपनिरीक्षक राहुल चव्हाण, गायके यांच्या पथकाने आरोपीस पकडले. त्याने पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला अटक करीत न्यायालयात हजर केले असता, १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. ही कामगिरी सहायक आयुक्त विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक पातारे, उपनिरीक्षक चव्हाण, गायके, अंमलदार श्याम गायकवाड, अमोल सोनटक्के, प्रविण कुऱ्हाडे, अमोल देशमुख, अभिलाष चौधरी, वैभव वाघचौरे, संगिता दुबे, सोनाली वडनेरे, सुनिता चेके यांच्या पथकाने केली.
पिनरेस्टसह इतर वेबासाईटचा वापरआरोपीने पीडित तरुणीची बदनामी करण्यासाठी पिनरेस्ट, यूथ फोर वर्क नावाच्या वेबसाईटचा वापर केला आहे. या वेबसाईटवर बनावट प्रोफाईल तयार केली. त्याशिवाय तरुणीला सोशल मिडिया, मोबाईलवर फोन आणि टेक्स्ट मेसेज करुनही विनयभंग केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.