- विकास राऊत
मराठवाडा : मराठवाड्यातील महसूलचा कारभार सध्या ‘प्रभारीं’च्या खांद्यावर आहे. २८ उपजिल्हाधिकारी आणि ९ तहसीलदारांच्या रिक्त पदांवर अधिकारी नेमण्यात शासनाने दिरंगाई केल्यामुळे सगळा कारभार ढेपाळला आहे. बीडमध्ये ६ जागा, उस्मानाबाद ५, परभणी ४, औरंगाबाद व नांदेड, हिंगोलीत प्रत्येकी ३ जागा तर जालना, लातूर प्रत्येकी २ जागा रिक्त आहेत. परिणामी सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात परवड होत आहे. किरकोळ कामांसाठी नागरिकांना महसूल प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
मध्यंतरी शासनाने काही उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. परंतु ते अधिकारी विद्यमान जागेवरून कार्यमुक्तच केले नाहीत. त्यामुळे जागा तशाच रिक्त राहिल्या. महत्त्वाचे म्हणजे निवासी उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन, भूसंपादन, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुनर्वसन, रोहयो, निवडणूक अधिकारी या पदावरील जागा रिक्त आहेत. या सर्व विभागांच्या जबाबदाऱ्या प्रभारी अधिकाऱ्यांवर टाकल्यामुळे ते विभागात येतच नाहीत. त्यामुळे विभागात शेकडो संचिकांचा ढीग साचला आहे. परिणामी सामान्य नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.
महसूल उपायुक्त नाहीडिसेंबर २०१७ मध्ये प्रल्हाद कचरे हे विभागीय महसूल उपायुक्त पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर शासनाने महसूल उपायुक्त या पदावर अधिकाऱ्याची नेमणूकच केली नाही. चार महिन्यांपासून महसूल उपायुक्त हे पद रिक्त आहे. या पदावर शासनाने अधिकारी नियुक्त न केल्यामुळे अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. ऐन उन्हाळ्याच्या काळात हे पद रिक्त राहिले आहे.
विभागातील रिक्त जागा- औरंगाबाद : निवासी उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी. - जालना : विशेष भूसंपादन अधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी.- परभणी : जिल्हा पुरवठा अधिकारी, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी, विशेष भूसंपादन अधिकारी, रोहयो उपजिल्हाधिकारी.- हिंगोली : विशेष भूसंपादन अधिकारी, उपविभागीय अधिकारी.- नांदेड : भूसंपादन उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी, रोहयो उपजिल्हाधिकारी.- बीड : विशेष भूसंपादन अधिकारी (एकूण तीन जागा), उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन, निवडणूक, पुरवठा अधिकारी.- लातूर : उपजिल्हाधिकारी रोहयो, विशेष भूसंपादन अधिकारी.- उस्मानाबाद : उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन, रोहयो, सामान्य प्रशासन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी.