लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना धक्काबुक्की करणारे अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे आणि गंगाखेडचे तलाठी शिवाजी मुरकुटे यांना मारहाण करणारे पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचाºयांनी १२ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे़ जिल्हाभरातील अधिकारी, कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने महसूलचा कारभार ठप्प पडला आहे़अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खा़ राहुल गांधी यांच्या सभेच्या दिवशी कर्तव्यावर उपस्थित असलेले तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना सभामंडपात जाण्यास मज्जाव करण्यात आला़ तहसीलदार कडवकर यांनी स्वत:ची ओळख देऊन ओळखपत्र दाखविल्यानंतरही अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी त्यांना धक्काबुक्की करून सभामंडपात प्रवेश दिला नाही़ तालुकास्तरीय दंडाधिकाºयांना दिलेली ही वागणूक निषेधार्ह असून, या विरुद्ध तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनांबरोबरच महसूल कर्मचारी संघटनांनीही आंदोलनाची भूमिका घेतली़ या घटनेच्या दुसºयाच दिवशी गंगाखेड येथे तलाठी शिवाजी मुरकुटे यांना पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ यांनी मारहाण केली़ या दोन्ही घटनांमुळे महसूलच्या अधिकारी, कर्मचाºयांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, दोषी पोलीस अधिकाºयांविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारपासून जिल्ह्यात बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे़ मागण्या मान्य न झाल्यास मंगळवारपासून मराठवाड्यात आंदोलन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
महसूल कर्मचारी बेमुदत संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:29 AM