कुंभार पिंपळगाव : महसूल पथकावरील हल्ल्यानंतर संपूर्ण महसूल विभाग खडबडून जागा झाला असून, संपूर्ण तालुक्यात रात्री-बेरात्री तसेच दिवसाही अवैध वाळू वाहतुकीवर कडक कारवाईचे सत्र महसूल पथकाने हाती घेतले असून, रविवारी रात्री दोन हायवा ट्रकवर महसूल पथकाने कार्यवाही केली असून, यामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.तहसीलदार कैलास अंडिल यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महसूल पथकाने रविवारी साडेसात वाजता उक्कडगाव फाट्याजवळ हायवा ट्रक (एम.एच.२१-एक्स-६२२१) तर रात्री साडे दहा वाजता तीर्थपुरी, जोगलादेवी रस्त्यावर दुसरा ट्रक (एम.एच.२१-एक्स- ६९९१) या ट्रकवर कार्यवाही केली. यावेळी महसूल पथकात तहसीलदार कैलास अंडिल, मंडळ अधिकारी एस.बी. राऊत, तलाठी बी.एस. सानप, तलाठी आर. कांबळे, कोतवाल शेख पाशा शेख अब्दूल, कोतवाल गोविंद पतंगे यांचा समावेश आहे.महसूल पथक अवैध वाळू वाहतुकीच्या कार्यवाहीच्या कामाला लागलेले असून, कार्यवाही सुद्धा वाढलेली दिसत आहे. या सर्व घटनेमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले असल्याचे दिसत आहे. तर पकडलेली वाहने सोडण्यात जाणार नसल्याचे महसूलकडून सांगण्यात आले.याबाबत तहसीलदार अंडिल म्हणाले की, वाळूमाफियांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर केलेला हल्ला हा चुकीचा असून, यामुळे आता एकाही ट्रकमधून अवैध वाळू वाहतूक तालुक्यात होणार नाही. आता ट्रकसोबतच संबंधित मालकांवर ही कडक कारवाई करण्यात येणार आहे. (वार्ताहर)
महसूलने वाळूतस्करांवर कारवाईचा फास आवळला
By admin | Published: November 15, 2016 12:54 AM