मालमत्ता खरेदी-विक्रीत सवलतीनंतर बुम: ३१ डिसेंबरपर्यंत सवलतीची मुदत
औरंगाबाद: लॉकडाऊनमध्ये मे महिन्यानंतर हळूहळू शिथिलता दिल्यानंतर मालमत्ता खरेदी-विक्रीत मुद्रांक शुल्कात ३ टक्के सवलत दिल्याने या व्यवहारांनी गती घेतली आहे. मागील तीन महिन्यांत १३० कोटींहून अधिकचा महसूल औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांतून मिळाला आहे.
३१ डिसेंबरपर्यंत सवलतीची मुदत असून नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मुद्रांक विभागाचे उपमहानिरीक्षक सोहम वायाळ, मुद्रांक अधिकारी दीपक सोनवणे यांनी केले.
तीन महिन्यांत ४२ हजार ६१३ व्यवहार तीन जिल्ह्यांत झाले. ऑगस्ट महिन्यांत औरंगाबादमध्ये ५ हजार २१४ व्यवहारातून २७ कोटी, जालन्यात २ हजार ७४२ व्यवहारांतून ६ कोटी, बीडमध्ये २ हजार ८६५ व्यवहारातून ९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. सप्टेंंबरमध्ये औरंगाबादेत ७ हजार ३०० खरेदी विक्रीचे व्यवहार झाले, त्यातून २७ कोटी, जालन्यात ३ हजार ९२९ व्यवहारातून ६ कोटी, बीडमध्ये ५ हजार २०३ व्यवहारातून १२ कोटी तर ऑक्टोबरमध्ये औरंगाबादमध्ये ६ हजार ९०२ व्यवहार झाले. २८ कोटींचा महसूल त्यातून मिळाला. जालन्यात ३ हजार २९२ व्यवहारातून ६ कोटी तर बीडमध्ये ६ हजार ८६ व्यवहारातून १० कोटींचे उत्पन्न शासन तिजोरीत गेले.
सुटीच्या दिवशी कार्यालय सुरू
३१ डिसेंबरपर्यंत मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सवलत असल्यामुळे या महिन्यांतील १२, १९ आणि २६ डिसेंबर रोजी दस्तनोंदणी कार्यालये सुरू राहणार असल्याचे उपमहानिरीक्षक वायाळ यांनी कळविले आहे. तीन्ही जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये वरील तारखांना सुरू राहणार आहेत. ३१ डिसेंबरपूर्वी जास्तीतजास्त नागरिकांनी ३ टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी व्यवहार करावेत, असे आवाहन उपमहानिरीक्षक वायाळ, सहजिल्हा निबंधक सोनवणे यांनी केले आहे.