वाळूज महानगर : बजाजनगरातील वाढत्या अतिक्रमणांच्या तक्रारीची दखल घेऊन एमआयडीसीच्या पथकाने शुक्रवारी विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर बजाजनगरातील अतिक्रमणांचा आढावा घेतला.
बजाजनगर भागातील एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडांवर अतिक्रमण करून अनेकांनी मोठ्या प्रमाणात जागा गिळंकृत केली आहे. या जागेवर शाळा, उद्योग सुरू करण्यात आले आहेत. एमआयडीसीकडून अनेकांना नोटिशीही बजावल्या आहेत; पण संबंधितांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून नोटिशींचा विषय स्थानिक पातळीवरच दाबला आहे. त्यामुळे स्थानिक अधिकारीही अतिक्रमणांसंदर्भात ठोस कारवाई करीत नाहीत.
तक्रारी आल्या तरच एमआयडीसीने कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे त्रस्त लोकांनी आता थेट तक्रारी करायला सुरुवात केली आहे. महाराणा प्रताप चौकालगत असलेल्या महावीर कॉम्प्लेक्ससंदर्भात महावीर धुमाळे यांनी अनेकदा मोकळ्या जागेवरील अनधिकृत बांधकाम काढण्याची तक्रार केली; पण एमआयडीसीने प्रत्येक वेळी केवळ आश्वासन देऊन या विषयला बगल दिली आहे.
दरम्यान, मराठा मावळा संघटनेतर्फे महिला प्रदेश सरचिटणीस छाया महेर, पंढरीनाथ गोडसे, सोमीनाथ पवार, राजेश धुरट, वर्षा कुलकर्णी, उदयराज गायकवाड, अभिलाष इथापे, सुनीता राजपूत, विजयसिंह महेर आदींनी शुक्रवारी कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांची भेट घेतली. पी-११८ वरील महावीर कॉम्प्लेक्समध्ये मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून केलेले पक्के बांधकाम काढण्याच्या मागणीचे निवेदन दिले. याची दखल घेत कार्यकारी अभियंता हर्षे यांनी शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पथकासह बजाजनगरात विविध ठिकाणी भेटी देत पाहणी केली.यासंदर्भात एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. स. अभियंता बी.एस. दीपके यांनी कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांनी शुक्रवारी बजाजनगरात दोन-चार ठिकाणी भेट दिली आहे. मात्र, ही नियमित भेट होती, असे त्यांनी सांगितले.
बजाजनगरातील अतिक्रमणांची पाहणीतक्रारीच्या अनुषंगाने एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांनी शुक्रवारी सायंकाळी बजाजनगर येथे पथकासह भेट देऊन अतिक्रमणांचा आढावा घेतला. हर्षे यांनी येथील पी-९५ व पी-११८ मध्ये झालेले अनधिकृत बांधकाम, तसेच एमआयडीसीच्या नियोजित भाजीमंडईच्या ओट्यावर झालेल्या अतिक्रमणांची पाहणी केली. यावेळी स. अभियंता बी.एस. दीपके, उपअभियंता सुधीर सूत्रावे, अभियंता मुळे, अभियंता पवार, कर्मचारी भरत साळे, गौतम मोरे, प्रशांत सरवदे आदींची उपस्थिती होती.