लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्याच्या विविध अनुशेषासाठी घेण्यात येणारी मंत्रिमंडळाची बैठक यावर्षी होणे आता शक्य नसून यंदाची बैठक रद्दच झाल्यात जमा आहे. गेल्या वर्षी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील घोषणांचा आढावा सोमवारी बैठकीत घेतल्यामुळे यावर्षी बैठक होणे जवळपास शक्य नसल्याचे बोलले जात आहे.गेल्या वर्षी १ ते ४ आॅक्टोबरदरम्यान बैठक झाली होती. यंदाचा आॅक्टोबर सरला, नोव्हेंबर संपत आला आहे. ११ डिसेंबरपासून सुरू होणाºया हिवाळी अधिवेशनाची लगबग सुरू झाल्याने मुंबईतच मागील वर्षी केलेल्या घोषणांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतल्यामुळे यावर्षी बैठक होण्याची चिन्हेजवळपास मावळले आहेत.सुमारे ५० हजार कोटी रुपयांची विकासकामे, योजना व अनुशेषांच्या घोषणा गेल्या वर्षी मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्यात आल्या होत्या. मराठवाडा वॉटर ग्रीड योजना, जालना रेशीमकोष बाजारपेठ, गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संस्था स्थापन करणे, औरंगाबाद येथील जलसंधारण आयुक्तालय, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी येथे नवी कौटुंबिक न्यायालये स्थापन करणे आदी विविध विषयांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. मराठवाड्याबाबत शिवसेना-भाजपला काहीही आस्था नाही. आता बैठक होईल की नाही, याची शाश्वती नाही. मागील वर्षाच्या कामांची अंमलबजावणी झालेली नाही. असा सूर विरोधकांनी आळविण्यास सुरु वात केली आहे.मराठवाड्यात रस्ते, आरोग्य सुविधांकडे मोठ्या प्रमाणात लक्ष देण्याची गरज आहे, मागील वर्षी केलेल्या घोषणांनंतर सिंचन वगळता कुठल्याही अनुशेष व योजनांना गती मिळालेली नाही. त्यामुळे यंदा बैठक झाली तर किमान चर्चा तरी होईल, अशी अपेक्षा होती.
मराठवाड्याचा आढावा मुंबईतच; मंत्रिमंडळ बैठक रद्दच?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 1:48 AM