लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयातील दिशा समितीची बैठक शुक्रवारी महापालिकेच्या योजनांवर गाजली. खा.चंद्रकांत खैरे यांनी या बैठकीत सुमारे तीन तास महापालिकेच्या अंतर्गत सुरू असलेल्या समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजनेतील गैरव्यवहारावर आवाज चढविला. २८ योजनांच्या आढाव्यासाठी असलेली ही बैठक पहिल्या सत्रात मनपाच्या योजनांवरच चालली.मागील अडीच वर्षांत खा. खैरेंची मनपा प्रशासन आणि राजकारणात विशेष अशी बैठक नव्हती.समांतर जलवाहिनीची योजना मी आणली आहे, त्या योजनेबाबत माझ्यावर खूप आरोप झाले आहेत. मी कंपनीच्या बाजूने असल्याची टीका माझ्यावर झाली आहे. योजनेचा ठराव रद्द करू नका, असे तत्कालीन आयुक्त बकोरिया यांना सांगितले होते. लवादात जर कंपनी जिंकली तर मनपा रक्कम कुठून देणार, असा सवाल त्यांनी मनपा अधिका-यांना केला. कंपनीची अंतर्गत भांडणे होती, आर्थिक वाद होते. आयुक्त मुगळीकर स्वत:च परेशान आहेत, त्यामुळे ते लक्ष घालतील, याची शाश्वती नाही. यापुढे शहराला काहीही मिळणार नाही, त्यामुळे समांतरची योजना झाली पाहिजे. भूमिगत गटार योजनेच्या पीएमसीवर गुन्हा दाखल केला पाहिजे. योजनेच्या कामात वापरलेले पाईप बोगस आहेत. स्मार्ट सिटीचे काय झाले. पालक सचिव कोण आहेत, याबाबत प्रशासन काही आढावा घेत आहे की नाही. मनपा हद्दीत स्मार्टसिटीचे काम होणार असताना महापौरांना त्याबाबत काहीही माहिती नसल्याचे मत खैरेंनी व्यक्त केले.मावळते महापौर भगवान घडमोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, जि.प.अध्यक्ष देवयानी डोणगावकर, आ.अतुल सावे, जिल्हाधिकारी एन.के.राम, शहर अभियंता एस.डी.पानझडे, सिकंदर अली, अफसर सिद्दीकी, न.प.सीईओ आदींची यावेळी उपस्थिती होती.आ.अतुल सावे म्हणाले, समांतरबाबत फेबु्रवारीमध्ये सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी आहे. तत्पूर्वी मनपाने जलवाहिनीची अवस्था कशी आहे. नवीन जलवाहिनी टाकण्याची किती गरज आहे, याचे विनंतीपत्र न्यायालयासमोर मांडावे, अशी सूचना शहर अभियंता पानझडे यांना केली.
‘दिशा’च्या बैठकीत मनपाच्या विविध योजनांचा घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:53 AM