औरंगाबाद : महापालिकेचा सुधारित अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत तयार करण्यात येणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येईल.
मनपा निवडणुकीसंदर्भात कोणतेही आदेश नसल्यामुळे संपूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत प्रशासन आहे. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गतवर्षी १,०९३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. हा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी तब्बल १,८०० कोटींच्या कामांना कात्री लावली होती. पालिकेचे उत्पन्न व खर्च यांची सांगड घालून वास्तववादी अर्थसंकल्प सादर केल्याचे सांगण्यात आले होते. हा अर्थसंकल्प सादर करताना विविध विकासकामांचा समावेश नव्याने करण्यात आला होता. त्यात प्रामुख्याने आदर्श रस्ते, बहुमजली पार्किंग, गरवारे क्रीडा संकुलात पोहण्याचा तलाव, अम्युझमेंट पार्क, दुग्धनगरी, शहरातील नाट्यगृहांचे नूतनीकरण यासह अन्य कामांचा समावेश होता. त्यापैकी काही कामे सुरु करण्यात पालिका प्रशासनाला दिवाळीनंतर यश आले परंतु बहुतांश कामे सुरुच होऊ शकली नाहीत. याबद्दल माहिती देताना मुख्य लेखाधिकारी संजय पवार म्हणाले, मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर केला जाईल. महापालिका निवडणुकीबद्दल निवडणूक आयोगाचे काहीच आदेश नाहीत, त्याबद्दलचे परिपत्रकही नाही. त्यामुळे संपूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प तयार केला जाईल.