या घटनेत पोलीस नाईक हसिबउद्दीन गयोसाउद्दीन शेख हे जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेख हे सिडको वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. गुरुवारी सकाळपासून ते आणि त्यांचे सहकारी घुगे हे हायकोर्ट वाहतूक सिग्नल चौकात वाहतूक नियमन करीत होते. सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास सिडकोकडून आलेल्या रिक्षात (एमएच- २० ईके- ०८०४) चालकाशेजारी दोन प्रवासी आणि मागील सीटवर चार प्रवासी बसलेले त्यांना दिसले. कारवाई करण्यासाठी शेख यांनी समोरील दोन्ही प्रवासी उतरविले आणि स्वतः रिक्षात बसून चालकाला रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. रिक्षाचालक फारुख शहा निसार शहा (रा. हिनानगर, चिकलठाणा) याने शेख यांना जोराचा धक्का मारून खाली ढकलले व रिक्षा दामटली. शेख यांनी तोल सावरण्यासाठी रिक्षाचा रॉड पकडला. त्यामुळे रिक्षासोबत ते १० ते १५ फूट फरपटत गेले. रिक्षाचे मागील चाक पायाच्या घोट्यावरून गेल्याने ते खाली पडले. यात त्यांच्या पायाचे हाड मोडले, उजव्या हाताला आणि गुडघ्याला जबर दुखापत झाली. यानंतर रिक्षाचालक सुसाट निघाला. हा प्रकार पाहणाऱ्या वाहनचालकांनी पुढे काही अंतरावर त्याला पकडून चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. शेख यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आरोपी फारुख शहाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली.
चौकट
दोन रुग्णालयांतून तिसऱ्या ठिकाणी दाखल
शेख यांना जखमी अवस्थेत एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे पोलीस प्लॅनची सुविधा नसल्यामुळे त्यांना समर्थनगरातील जोशी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, पोलिसांवरील उपचाराचे शासनाने बिल न दिल्यामुळे त्यांच्या रुग्णालयाने पोलीस प्लॅनअंतर्गत उपचार बंद केल्याचे सांगण्यात आल्याने शेख यांना सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.