औरंगाबाद : वाहतुकीला अडथळा आणणारी रिक्षा बाजुला घेण्यास सांगणाऱ्या पोलिसाला रिक्षाचालकाने शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास रेल्वेस्टेशन परिसरात घडली.
याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. रवी वामानराव हिवाळे (वय ४३,रा. द्वारकापुरी, उस्मानपुरा) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, वेदांतनगर ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई मोतीराम नामदेव होलगडे हे रविवारी रात्री रेल्वेस्टेशन परिसरात गस्तीवर असताना आरोपी रवीने त्याची रिक्षा ‘नो पार्किंग’मध्ये उभी केल्याचे दिसले.
या रिक्षामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याने होलगाडे यांनी रवीला त्याची रिक्षा तेथून काढण्याचे माईकवरून सांगितले. वारंवार आदेश देऊनही रवीने रिक्षा काढली नाही. यामुळे होलगाडे हे त्याच्याकडे जाताच रवीने धक्काबुक्की करीत त्यांना आक्षेपार्ह वर्तन केले. या घटनेनंतर होलगाडे यांनी आरोपीविरोधात उस्मानपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली.