वीज बिल भरणा केंद्र सुटीच्या दिवशीही सुरू
औरंगाबाद : ‘महावितरण’कडून वीज बिल वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. वीज बिल वसुलीसाठी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. सुटीच्या दिवशीही वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडळ कार्यालयअंतर्गत अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शुक्रवार (दि.१९) शनिवार (दि.२०) आणि रविवार (दि.२१) या सुटीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहेत.
रेल्वेच्या एकाच हेल्पलाईन नंबरवर आता सर्व सेवा
औरंगाबाद : भारतीय रेल्वेत पूर्वी १८२ हा प्रवाशांना सुरक्षेसंबंधीचा हेल्पलाईन नंबर होता. प्रवाशांच्या सुविधेसाठी यापुढे हा नंबर १३९ या हेल्पलाईन नंबरसोबत जोडण्यात आला आहे. आतापर्यंत रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान चोरी, खिसेकापूपासून सुरक्षा तसेच इतर गुन्हेगारी प्रवृत्तीपासून मदत हवी असल्यास १८२ या नंबरवर सेवा मिळत होती. यापुढे प्रवाशांना मदतीसाठी तसेच स्वच्छता किंवा अन्य कुठलीही माहिती हवी असल्यास त्यांना १३९ या एकाच नंबरवर सर्व सेवा उपलब्ध होईल, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे देण्यात आली.