- संतोष हिरेमठऔरंगाबाद : मातीच्या ट्रॅकवर दुचाकी चालवून दाखवा आणि उत्तीर्ण झालात तर पर्मनंट लायसन्स मिळवा, अशी स्थिती सध्या शहरापासून काही अंतरावर असलेल्या साजापूर करोडी येथे आरटीओ कार्यालयाच्या जागेत पाहण्यास मिळत आहे. या ठिकाणी आधुनिक ट्रॅक उभारणीची प्रतीक्षाच करावी लागत आहे. मातीच्या ट्रॅकवरील चाचणीबाबत दुचाकीचालकांकडून रोष व्यक्त होत आहे.
साजापूर करोडी येथे आरटीओ कार्यालयाच्या मुख्य इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी जड व इतर वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करण्यात आला असून, त्यावर फिटनेस चाचणी घेतली जात आहे. त्याबरोबर पर्मनंट लायसन्सची चाचणीही येथेच घेतली जात आहे.
अशी घेतली जातेय चाचणीकरोडीत मातीच्या जागेत खांब उभे करून आठचा आकडा तयार करण्यात आला आहे. मोटार वाहन निरीक्षक आधी स्वत: या ट्रॅकमधून चालत जाऊन ‘दुचाकी कशी चालवायची’ हे सांगतात. ही चाचणी अनेकांसाठी मोठी ‘परीक्षा’ ठरत आहे. चाचणी देताना अनेक जण ट्रॅकवरच दुचाकीसह पडतात. अनुत्तीर्ण होणारे अनेक जण ट्रॅकला दोष देतात.
आधुनिक ट्रॅक प्रस्तावितयाठिकाणी आधुनिक ट्रॅक प्रस्तावित करण्यात आला आहे. ॲटोमोटेड टेस्टिंग सेंटरसह टर्निंग सर्कल चेक करण्यासाठी विशेष ट्रॅक उभारण्यात येणार आहे. याशिवाय वाहनांची टेस्ट घेत असताना या वाहनांच्या खालील भागाची टेस्ट करण्यासाठी रॅम्पचीही सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.
नियमानुसार ट्रॅक हवानियमानुसार लायसन्ससाठी चाचणी ट्रॅकवर घेतली पाहिजे. परंतु, करोडीत मातीच्या जागेत चाचणी घेतली जात आहे. वाहन चालविताना तोल जातो. बहुतांश चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.-राहुल बारवाल
ट्रॅकसाठी लवकरच निविदादुचाकी येत नसेल, तसेच दुचाकीचे टायर गुळगुळीत असेल तर चाचणीदरम्यान घसरून पडण्याचा प्रकार होत असल्याची बाब निरीक्षकांनी कळविली आहे. असे चालक सिमेंटच्या ट्रॅकवर चाचणी देताना पडले तर जखमी होतील. भौगोलिक परिस्थितीनुसार वाहन प्रत्येक जागेत चालविता आले पाहिजे. ब्रेक टेस्ट ट्रॅकवर लायसन्सची चाचणी घेता येणार नाही. ‘सीआयआरटी’च्या माध्यमातून ट्रॅक करण्यात येणार आहे. लवकरच निविदा निघेल.- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी